हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:54 PM2023-06-12T15:54:34+5:302023-06-12T15:55:51+5:30
महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
Farmers Protest: पिकांची किमान आधारभूत किंमत(MSP) ठरवावी या मागणीसाठी कुरुक्षेत्रात शेतकरी नेते आणि प्रशासकीय अधिकारी, यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिपली गावात आयोजित 'महापंचायत'मध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. गर्दी टाळण्यासाठी दिल्ली-चंदीगड मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
#WATCH | Haryana: Farmers block a road in Kurukshetra as they gather here to hold Mahapanchyat over their demand for Minimum Support Price. pic.twitter.com/W6LyWhG1bq
— ANI (@ANI) June 12, 2023
हरियाणातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या खरेदीत किमान आधारभूत किंमत ठरवण्याची मागणी कर आहेत. एमएसपीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. हरियाणा, पंजाब, यूपी आणि इतर शेजारील राज्यांतील शेतकरी नेते त्यांच्या मागणीसाठी 'एमएसपी दिलाओ, किसान बचाओ' महापंचायतीसाठी पिपली धान्य मार्केटमध्ये जमले होते. यावेळी चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी कुरुक्षेत्रहून दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.
शेतकऱ्यांची मागणी काय?
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी 8,528 शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत (BBY) 36,414 एकर क्षेत्रात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी 29.13 कोटी रुपये वितरित केले. राज्य सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला बीबीवाय अंतर्गत सूर्यफूल पिकाचा समावेश करण्याची घोषणा केली होती. ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे सरकार MSP खाली विकल्या गेलेल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना निश्चित नुकसान भरपाई देते. एमएसपीपेक्षा कमी विकल्या जाणाऱ्या सूर्यफूल पिकांसाठी राज्य सरकार अंतरिम मदत म्हणून प्रति क्विंटल रुपये 1,000 देत आहे. पण, राज्य सरकारने 6,400 रुपये प्रति क्विंटल या एमएसपीवर सूर्यफुलाची खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
याच मागणीसाठी यापूर्वी 6 जून रोजी कुरुक्षेत्रच्या शहााबादमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. गुरुनाम सिंग चधुनी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली. सध्या दिल्ली-चंदीगड महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. शांततेत आंदोलन सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.