Farmers Protest: शेतकऱ्यांच्या भारत बंदचा पंजाब, हरयाणात प्रभाव; अन्यत्र संमिश्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:23 AM2021-03-27T05:23:34+5:302021-03-27T06:13:55+5:30
सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले,
विकास झाडे
नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणपंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत या बंदचा प्रभाव दिसून आला. दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी १२० दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, मालास किमान आधारभूत किंमत द्या, आंदोलक शेतकऱ्यांवरचे सर्व खटले रद्द करा, डिझेल, पेट्रोल आणि गॅसदर कमी करा आदी मागण्या आज शेतकऱ्यांनी केल्या.
सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. ओखला, गाझीपूर आणि आझादपूरच्या भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गाझीपूरचे रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी बंद केले. गाझीपूर, टिकरी आणि सिंधू सीमेवर शेतकऱ्यांनी निषेध व घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी नृत्य आणि गाण्याने वातावरण निर्मिती करण्यात आली. आजच्या भारत बंदची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यात सर्वसामान्यांचा खूप सहभाग होता.
बिहारमध्ये २० जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता
काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवला. शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांना गुजरात येथे पोलिसांनी अटक केली. बिहारमध्ये २० जिल्ह्यांमध्ये भारत बंद आंदोलनाची तीव्रता होती. पंजाबमध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात आंदोलनाची तीव्रता नव्हती.