Farmers Protest : परिस्थिती गंभीर! शेतकरी आंदोलनादरम्यान 3 पोलिसांचा मृत्यू; 30 जखमी, एकाला ब्रेन हॅमरेज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:25 AM2024-02-23T10:25:00+5:302024-02-23T10:34:09+5:30
Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान विविध कारणांमुळे आतापर्यंत किती पोलिसांचा मृत्यू झाला आणि किती पोलीस जखमी झाले याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान 21 वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संयुक्त किसान मोर्चाचा आज काळा दिवस आहे. याच दरम्यान, हरियाणाच्या अंबाला पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात येणार असल्याचे पत्र जारी केले आहे. या आंदोलनादरम्यान विविध कारणांमुळे आतापर्यंत किती पोलिसांचा मृत्यू झाला आणि किती पोलीस जखमी झाले याबाबत देखील पोलिसांनी माहिती दिली आहे.
हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान 30 पोलीस जखमी झाले आहेत. हरियाणात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. एकाला ब्रेन हॅमरेज झालं आहे. त्याचवेळी, आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाचा जिममध्ये मृत्यू झाला. हरियाणा पोलिसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, दिल्लीकडे मोर्चा काढताना शेतकरी शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
Yesterday, we lost our braveheart DSP Dilpreet Singh who was performing duty at Khanori Border, Sangrur
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) February 23, 2024
Dilpreet served Punjab Police and the people of Punjab for over 31 years
We stand by his family in their hour of grief and will do everything to support them.
Our prayers… pic.twitter.com/UUqlQ6A7Yh
पोलीस प्रशासनावर दगडफेक करून, गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारी व खासगी मालमत्तेचे गैरप्रकार करत आहेत. अनेक शेतकरी नेते आंदोलनात सक्रिय भूमिका बजावत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचं पोलिसांनी पत्रात लिहिलं आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रक्षोभक भाषणांचा सातत्याने प्रचार केला जात आहे.
सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या पोस्ट सातत्याने टाकल्या जात आहेत. या आंदोलनात भाषण करून आंदोलकांना प्रशासनाविरोधात भडकावण्यात येत आहे. शासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात चुकीचे शब्द वापरले जात आहेत. अशांतता निर्माण होत आहे. त्यामुळे आता आंदोलक शेतकऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) कारवाई करण्यात येत आहे. आंदोलकांकडून सरकारी आणि खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले, याचा अंदाज घेतला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.