Farmers Protest : ५ किलो बदाम अन् ५,१०० रुपये! ५० किमी धावत 'तो' पोहोचला शेतकरी आंदोलनात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 03:28 PM2021-02-15T15:28:51+5:302021-02-15T15:30:09+5:30
Farmers Protest : ५ किलो बदाम आणि ५,१०० रुपयांची पैज त्यानं जिंकली, गाझीपूर सीमेपर्यंत तो धावत पोहोचला.
Farmers Protest : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. यातच एक तरुण राहतं घर ते गाझीपूर सीमेपर्यंत धावत शेतकरी आंदोलनात सामील होण्यासाठी पोहोचला आहे. विशेष म्हणजे, यासाठी तरुणाच्या मित्रांनी त्याच्यासोबत ५ किलो बदाम आणि ५,१०० रुपयांची पैज लावली होती. ती पूर्ण करत मोनू डागर हा तरुण गाझीपूर सीमेवर पोहोचला आहे. (Man Run From Baghpat To Gazipur Border)
"गावात मित्रांनी ५ किलो बदाम आणि ५,१०० रुपयांची पैज लावली होती. बागपत ते गाझीपूर सीमेपर्यंत धावत मला पोहोचायचं होतं. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ही पैज होती आणि मला ती जिंकायची होती. त्यामुळे मी इथंवर धावत पोहोचलो. मी पैज जिंकलोय. राकेश टिकैत यांची मला भेट घ्यायचीय", असं बागपतच्या सिखेडा गावातील मोनू डागर गाझीपूर सीमेवर पोहोचल्यावर म्हणाला.
मोनू डागर यानं रविवारी सकाळी ११ वाजता धावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर दुपारी ४ वाजता तो गाझीपूर सीमेवर पोहोचला. दरम्यान, सलग धावत राहिल्यानं त्याची तब्येत बिघडली होती. गाझीपूर सीमेवर पोहोचताच त्याला मेडिकल कॅम्पमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथं त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोनू डागर याच्यासोबत त्याचे काही इतर मित्रही धावत निघाले होते. पण काही वेळाच्या अंतरानं ते गाडीत विश्रांती घेत होते. पण मोनूनं विश्रांती घेतली नाही.