ट्रॅक्टरद्वारे सराव, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या निवासस्थांनांना घेराव घालू शकतात आंदोलक, गोपनीय अहवालामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 01:45 PM2024-02-11T13:45:24+5:302024-02-11T13:46:19+5:30
Farmers Protest: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पोलीस दल अंबालामधील शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आले आहे. तसेच तीन स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टरद्वारे घेराव घालण्याचा सराव केला असून, हे आंदोलक गुपचूपपणे दिल्लीत घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांच्या निवासस्थानांना घेराव घालण्याची शक्यता गोपनीय अहवालामधून वर्तवण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाबाबत गोपनीय रिपोर्ट समोर आला आहे त्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने अनेकदा सराव केला आहे. आतापर्यंत याची ४० वेळा रंगीत तालीम झाली आहे. आंदोलनासाठी १५ ते २० हजार शेतकरी २००० ते २५०० ट्रॅक्टरसह येऊ शकतात. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधून शेतकरी येण्याची शक्यता आहे. गोपनीय अहवालानुसार आतापर्यंत या आंदोलनासाटी शेतकरी संघटनांनी १०० हून अधिक बैठका घेतल्या आहेत.
या आंदोलनात सहभागी होऊन अराजकवादी घटक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. कार, दुचाकी, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून शेतकरी आंदोलक येऊ शकतात. काही शेतकरी गुपचूपपणे येऊन पंतप्रधान, गृहमंत्री, कृषिमंत्री आणि भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर जमून हिंसाचार करू शकतात. सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर आणि दिल्लीमध्ये कडेकोड सुरक्षेची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलकांमी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना अडवण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. सर्व पोलीस दलाला अंबाला येथील शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आले आहे. तसेच तीन स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.