"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 09:39 AM2021-02-05T09:39:42+5:302021-02-05T09:43:32+5:30

Farmers Protest And Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे.

Farmers Protest rakesh tikait says to implement mahendra tikait formula for msp | "देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

Next

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीशी जोडली आहे. ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच 3 क्विंटल (300 किलो) गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी करायला हवी असंही म्हटलं आहे. यासोबतच देशात "टिकैत फॉर्मूला" लागू करा असं सांगितलं आहे. 

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. MSP बाबत महेंद्रसिंह टिकैत यांचा फॉर्म्युला लागू केला जावा असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. "1967 मध्ये सरकारने MSP निश्चित केला होता. तेव्हा गव्हाची किंमत 76 रुपये प्रति क्विंटल होती. तेव्हा प्रायमरी शाळेतील शिक्षकाची पगार महिना 70 रुपये होती. तेव्हा शिक्षक त्याच्या महिन्याच्या पगारात 1 क्विंटल गहू खरेदी करू शकत नव्हता. आम्ही एक क्विंटल गहू विकून अडीच हजार वीट खरेदी करु शकत होतो" असं टिकैत यांनी म्हटलं आहे. 

राकेश टिकैत यांनी "तेव्हा सोन्याची किंमत 200 रुपये प्रति तोळा होती. 3 क्विंटल गहू विकून खरेदी केला जाऊ शकत होता. आता आम्हाला 3 क्विंटल गव्हाच्या बदल्यात 1 तोळा सोनं द्या आणि त्याच हिशोबाने किंमत निश्चित करा. जेवढी किंमत अन्य वस्तूंची होईल, तेवढीच किंमत गव्हाची व्हायला हवी" अशी मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सहा फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती देखील टिकैत यांनी दिली आहे. 

...अन् गर्दीमुळे शेतकरी महापंचायतीत मंच तुटला, राकेश टिकैत यांच्यासह अनेक नेते कोसळले; Video व्हायरल

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. मात्र नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मंच अचानक तुटला. राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेते या मंचावर उपस्थित होते. मात्र मंच तुटल्याने ते खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. 

"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात" असं गुर्जर यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. गुर्जर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये" असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Farmers Protest rakesh tikait says to implement mahendra tikait formula for msp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.