'गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्यांचे फोटो दिल्लीतील आंदोलनात कसे?'
By महेश गलांडे | Published: February 2, 2021 12:12 PM2021-02-02T12:12:48+5:302021-02-02T12:18:37+5:30
शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले.
नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते. त्यानंतर, आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी आपली विश्वासर्हता गमावल्याचं गडकरी यांनी म्हटलंय. नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाविषयीही आपलं मत मांडलं. यावेळी, अर्थसंकल्पाचे आणि स्क्रॅप पॉलिसीचं कौतुकही केलं.
शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी, सारा देश दु:खी झाल्याचे उद्गार काढले आहेत. त्यानंतर, आता नितीन गडकरी यांनीही दिल्ली आदोलनात 26 जानेवारी रोजी जे घडलं ते निश्चितच राजकीय षडयंत्र होतं, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला, तो पूर्णपणे राजकीय षडयंत्रच होते. आंदोलनात काही देशद्रोही घटकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी केली होती. त्यामुळे, 26 जानेवारीच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलकांनी विश्वासर्हता गमावली आहे, असे गडकरी यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना म्हटलंय.
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन देणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, न्यायालयानेही जामीन देण्यास नकार दिला आहे. या आंदोलनात त्यांचे फोटोही दिसले. मग, शेतकरी आंदोलनात हे कसे आले? असा सवाल गडकरी यांनी विचारला आहे. लाल किल्ल्यावरील घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचेच सर्वात मोठे नुकसान झालंय. कारण, आंदोलक शेतकऱ्यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, तसेच शेतकरी आंदोलनाची सहानुभूतीही संपली. पंतप्रधान मोदींसर, कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनीही शेतकऱ्यांशी संवाद, चर्चा करायला तयार आहे. या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल, असेही गडकरी यांनी म्हटलंय.
स्कॅपिंग पॉलिसीमुळे 50 हजार जॉबची निर्मित्ती
स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे अॅटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना मिळणार आहे. कारण, 20 वर्षांत जुनी गाडी स्क्रॅप झाल्यानंतर नवीन गाडी घेणारच आहोत. देशात एकूण 1 कोटींपेक्षा जास्त गाड्या प्रदुषण करत होत्या, तसेच जास्तीचं पेट्रोलही खात होत्या. या गाड्या 10 ते 12 टक्क्यांनी जास्त प्रदुषण करत होत्या. त्यामुळे पहिला फायदा हा प्रदुषण कमी होईल. स्क्रॅपिंग मटेरियलचं रिसायकलींग होईल. मी कॉलेजमध्ये असताना स्कुटर खरेदी केली होती, त्यावेळी 32 किमीचा एव्हरेज ती देत होती. आता, आपण जी दुचाकी गाडी चालवतो ती 80 किमी एव्हरेज देते. याचाच अर्थ जुनं जाऊन नवीन आल्यानं फायदाच होईल, असे फायदे नवीन स्क्रॅप पॉलिसीचे गडकरी यांनी सांगितले आहेत. सरकारच्या या नवीन पॉलिसीमुळे देशात 50 हजार जॉब निर्माण होतील, तसेच 10 हजार कोटींची गुंतवणूकही होईल. आजपासून 15 दिवसांत मी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
राकेश टिकेत म्हणतात...
"देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचं राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्यानं देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे. त्याला अटक करा", असं शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात होणार का? याबाबत विचारलं असता टिकैत यांनी बंदुकीच्या धाकाखाली चर्चा होणं शक्य नाही असं म्हटलं आहे.