सरकारचा कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, गणतंत्रदिनी रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 02:06 AM2021-01-22T02:06:07+5:302021-01-22T06:54:21+5:30
शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत.
विकास झाडे -
नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी स्थगित करणे आणि तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला आहे.
शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत. आतापर्यंत १४७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गणतंत्र दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले आहे.
आज दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना रॅली काढू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. ही रॅली दिल्लीच्या रिंंग रोेडवर काढली जाणार आहे. दि. २३ रोजी देशभरात राजभवनाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, हा निर्णय आता रद्द करण्यात आला
आहे.
आंदोलनात केली शेतकऱ्याने आत्महत्या -
टिकरी सीमेवर शेतकरी जय भगवान (४२) यांनी आंदोलनादरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयात नेण्यात येत असताना भगवान यांचा मृत्यू झाला. विष खायच्या आधी त्यांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले. रोहटक जिल्ह्यातील पाकस्मा गावातील शेतकरी जय भगवान दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी व्हायला दिल्लीत आले होते. तेथे त्यांनी कृषी कायदे रद्द न होणे , शेतकरी आणि सरकार दोघेही आपल्या भूमिकांवर अडून बसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.
सरकारवर विश्वास ठेवायचा कसा?
एका शेतकरी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकरी नेते ही सरकारच्चा प्रस्ताव फसवा असून या प्रस्तावाला विरोध करायचा या मताचे आहेत. तर काहींना वाटते सरकारचा प्रस्ताव मान्य करायचा आणि सरकारने तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे.