शेतकऱ्याच्या मुलाची गगनभरारी, अमेरिकेतील विद्यापीठाकडून स्कॉलरशीप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:24 PM2020-07-16T16:24:09+5:302020-07-16T16:26:28+5:30
एका खेड्यात राहणाऱ्या शेतकरीपुत्राने बारावीच्या परीक्षेत 98.20 टक्के गुण मिळवले आहेत.
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक बोर्डाकडून बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी टॉप केले असून काहींना विद्यापीठात स्कॉलरशीपची संधी मिळाली आहे. त्यापैकीच एक असलेल्या शेतकरीपुत्राने 98.20 टक्के गुण मिळवत परदेशातील विद्यापीठाची स्कॉलरशीप मिळाली आहे.
उत्तर प्रदेशातील एका खेड्यात राहणाऱ्या शेतकरीपुत्राने बारावीच्या परीक्षेत 98.20 टक्के गुण मिळवले आहेत. या उत्तुंग यशामुळे शेतकरीपुत्राचा विदेशातील विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुराग तिवारी असे या मुलाचे नाव असून आपल्या यशाच्या माध्यमातून त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
बारावीच्या सीएचबीसी बोर्डाच्या परीक्षेत 98.20 टक्के गुण मिळाल्यानंतर अनुरागला अमेरिकेतील एका प्रतिष्ठित आयवी लीग युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशीपच्या माध्यमातून प्रवेश मिळाला आहे. लखीमपूर जिल्ह्यातील सरसन या लहानशा गावच्या अनुरागने अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाल्याचे सांगितले. या विद्यापीठातून तो अर्थशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेणार आहे. या परीक्षेत 18 वर्षीय अनुराग तिवारीस, गणित विषयात 95, इंग्रजी 97, राज्यशास्त्र 99, इतिहास आणि इकॉनॉमिक्समध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
अर्थशास्त्र विषयात अनुरागला आवड असल्यानेच त्याने अर्थशास्त्राचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनुरागने स्कॉलेस्टीक असेसमेंट टेस्ट (SAT) मध्ये 1370 गुण मिळवले आहेत. त्यामुळे, अमेरिकेतील प्रमुख विद्यालयांमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने सितापूर जिल्ह्यातील एका निवासी विद्यालयात राहून अनुरागने आपले शिक्षण पूर्ण केले. अनुरागने शेती करावी, अशीच त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, त्याच्या बहिणींनी त्याला सितापूरला पाठविण्यासाठी आग्रह धरला होता.