गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांकडून पक्क्या घरांची बांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:00 PM2021-03-13T20:00:44+5:302021-03-13T20:03:44+5:30
Farmers Protest : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात सुरू आहे आंदोलन
गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता १०० दिवसही पूर्ण होऊन गेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. परंतु अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. सध्याही हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मार्च महिन्यात दिल्लीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच गरमीपासून आपलं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच घरांची उभारणी सुरू केली आहे. याशिवाय या घरांमध्ये कुलर किंवा एसी लावण्याबाबतही विचार केला जात आहे.
"शेतकऱ्यांनी गरमीपासून बचावासाठी आंदोलनस्थळी घरांची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी या घरांमध्ये एसीदेखील लावणार आहोत. स्थानिक एसएचओ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊल काल कुंडली येथे घरांची उभारणी थांबवण्याचे प्रयत्न केले होते," अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते मंजित सिंग राय यांनी एएनआयशी बोलताना दिली.
"ही घरं शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीप्रमाणेच मजबूत आणि कायम असणारी आहेत. आतापर्यंत २५ घरांची उभारणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये १ हजार ते २ हजार घरांची उभारणी केली जाईल," अशी माहिती किसान सोशल आर्मीचे अनिल मलिक यांनी दिली. टिकरी सीमेवर ज्या घरांची उभारणी करण्यात आली आहे. ते सामान्य खोलीप्रमाणेच आहेत. यामध्ये कुलर, पंखे यांच्यासोबत खिडक्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच या घरांच्या वरील बाजूला गवत घालून गरमीपासून रक्षण केलं जात आहे.
Permanent structures come up at Singhu on the Delhi-Haryana border where farmers have been protesting against three agriculture laws for the past 108 days pic.twitter.com/hdApp7pTrr
— ANI (@ANI) March 13, 2021
२६ मार्चला भारत बंदची हाक
२६ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केला होती. तसंच निरनिराळ्या व्यक्तींविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते.