आंदोलकांची संख्या दुपटीवर करण्यासाठी शेतकऱ्यांची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 04:01 AM2021-01-14T04:01:05+5:302021-01-14T04:01:25+5:30
कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या, शेतकऱ्यांमध्ये रोष कायम!
विकास झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी, शेतकरी समाधानी नाहीत. बुधवारी सिंधू सीमेवर तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध करीत, कायदे मागे घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, अशी घोषणाबाजी केली.
बुधवार हा आंदोलनाचा ४९ वा दिवस होता. यादरम्यान जवळपास ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुप्रीम कोर्टाने या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, केंद्र सरकारवर दोषारोप केले असले तरी, न्यायालयाने दिलेला निर्णय हा केवळ आंदोलन संपविण्यासाठी आहे, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना कायद्यांची तात्पुरती स्थगिती नको असल्याने हे आंदोलन कायम राहणार आहे. उलट या आंदोलनातील सहभागींची संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत दुपटीने वाढविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. न्यायालयाने हस्तक्षेप केला असला तरीही मागे हटायचे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. गणतंत्रदिनी राजपथवर परेड करण्याआधीच घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या सीमेवर दररोज तालीम सुरू आहे. राजपथावर घोडेस्वारी करण्यासाठी एक तरुण शेतकरी सुशीलकुमार हा पंजाबच्या लखेलीवाली डाल इथून गाझीपूर सीमेवर पोहोचला आहे.