भुतांमुळे शेतकरी आत्महत्या...गृहमंत्रालयाचा अजब दावा
By Admin | Published: July 21, 2016 12:02 PM2016-07-21T12:02:21+5:302016-07-21T12:02:21+5:30
मध्यप्रदेशातील सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान 3 शेतक-यांच्या आत्महत्या करण्यामागे कोणतं आर्थिक कारणं किंवा कौटुंबिक समस्या नसून भूत आहेत असा दावा गृहमंत्रालयाने केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
भोपाळ, दि. 21 - मध्यप्रदेशातील सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान एकूण 418 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. यातील 3 शेतक-यांच्या आत्महत्या करण्यामागे कोणतं आर्थिक कारणं किंवा कौटुंबिक समस्या नसून भूत आहेत. हा दावा कोणी स्थानिक किंवा गावकरी करत नसून राज्याचं गृहमंत्रालय करत आहे. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात गृहमंत्रालयाने ही अजब माहिती दिली आहे.
पिकांचं नुकसान झाल्याने सेहोरे जिल्ह्यात अनेक शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मतदारसंघ याच जिल्ह्यात आहे. काँग्रेस आमदार शैलेंद्र पटेल यांनी सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान किती शेतक-यांनी आत्महत्या केली याची माहिती मागितली होती. यावर उत्तर देताना सरकारडून ही माहिती देण्यात आली. सरकारने दिलेल्या माहितीवर शैलेंद्र पटेल यांनी सरकार खरोखर भुतांवर विश्वास ठेवतं का ? यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
'आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच ही माहिती देण्यात आल्याचं', गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे. 'सेहोरे जिल्ह्यात 2014 पासून 418 शेतक-यांनी आत्महत्या केली असून यातील 117 जणांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही', असंही भुपेंद्र सिंग यांनी सांगितलं.
'पिकांचं नुकसान झाल्याने एकाही शेतक-याने आत्महत्या केली नसल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र मी त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहे. पिकांचं नुकसान झाल्याने आत्महत्या कऱणा-यांच्या अंत्यसंस्काराला मी स्वत: हजेरी लावलेली आहे', असं काँग्रेस आमदार शैलेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे.
'आत्महत्यांना शेतकरी गंभीरपणे पाहत आहे. विष विक्री करणा-यांना ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते घेणे कायद्याने बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याच्रपमाणे या कायद्याचं पालन होत आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे', अशी माहिती गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी दिली आहे.