शेतकऱ्यांनी फाडले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:47 AM2022-01-05T05:47:47+5:302022-01-05T05:47:55+5:30
भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : पंजाबमधील फिरोजपूरमध्ये बुधवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला विरोध करीत शेतकऱ्यांनी भडानावाला गावात पोलिसांनी उभारलेले नाके तोडले. गावागावात लावण्यात आलेले पंतप्रधान मोदी यांचे पोस्टर्स फाडले जात आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. आम्ही मोदी यांची रॅली होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी नेते जसबीर सिंग जस्सा यांनी सांगितले की, माछीवाडामध्ये काही लोक मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स लावत होते. त्यांना रोखण्यात आले. त्यांनी लावलेले पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचे पोस्टर्स फाडून फेकले. आम्ही मोदींची रॅली होऊ देणार नाही. सोबत शिदोरी आणि अंथरुण-पांघरुण घेऊन शेतकरी फिरोजपूरमध्ये दाखल होत आहेत. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान ७५० शेेतकरी शहीद झाले.
भाजप सरकारमुळे या शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पंजाबमधील शेतकरी मोदी यांना कदापि माफ करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वर्षांनंतर पंजाबला भेट देत आहेत. त्यांच्या पंजाब दौऱ्याला काही शेतकरी
संघटना विरोध करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर फिरोजपूर जिल्ह्यात १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पंतप्रधानांची आज पहिली रॅली
n केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच रॅली पंजाबमध्ये ५ जानेवारी रोजी होत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी येत आहेत.
n एक वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपची परिस्थिती फार चांगली नाही.
n शिरोमणी अकाली दलापासून वेगळे झाल्यानंतर भाजप प्रथमच विधानसभा निवडणूक लढविणार आहे. मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढींढसा उपस्थित राहणार आहेत.