दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, केला अश्रुधुराच्या गोळ्यांचा मारा
By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 20:44 IST2021-01-03T20:40:49+5:302021-01-03T20:44:08+5:30
Farmer Protest News : आंदोलनकर्ते शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर ही वादावादी एवढी वाढली की, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. एवढेच नाहीतर त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळेही डागले.

दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, केला अश्रुधुराच्या गोळ्यांचा मारा
चंदिगड - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक महिन्यानंतरही सुरू आहे. दरम्यान, रविवारी अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर हरियाणा बॉर्डर येथून हरियाणामध्ये प्रवेश करणारे शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर ही वादावादी एवढी वाढली की, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. एवढेच नाहीतर त्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळेही डागले.
महामार्गावर .शेतकरी आणि आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर रस्त्यावर वाहनांच्या सुमारे पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या. दरम्यान, सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हरियाणामधील धारुहेडाजवळ रोखण्यात आले आहे. हे सर्व शेतकरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले होते. ते हरियाणामधून दिल्लीकडे जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र हरियाणा पोलिसांनी त्यांना वाटेत रोखले.
यापूर्वी गुरुवारी राजस्थानमधून शेतकऱ्यांचा एक गट राजस्थान-हरियाणा सीमावरील शाहजहाँपूरमध्ये जबरदस्तीने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. सुमारे एक डझन ट्रॅक्टर बॅरिकेटिंग तोडून हरियाणामध्ये प्रवेश करत होते आणि दिल्लीकडे रवाना झाले होते.
शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे डागले. तसेच पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर या कारवाईचा काहीही परिणाम झाला नाही.