शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:14 AM2021-02-18T03:14:49+5:302021-02-18T06:35:29+5:30
Farmers Protests : शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे.
- विकास झाडे
नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने घोषित केल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोर्चातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी देशभर रेल रोकाचे आवाहन करण्यात आले आहे, तर २० फेब्रुवारीला यवतमाळ इथे महापंचायत होत आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत आणि महासचिव युधवीर सिंह येत आहेत. यवतमाळच्या आझाद मैदानावर ही सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ आयोजित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. आता तेच शेतकरी मोदी यांची पोल खोलणार असल्याची माहिती भाकियुचे नेते धर्मेन्द्र मलिक यांनी दिली.
हल्लेखोर मूळचा पंजाबमधील...
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाने मंगळवारी रात्री पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पंजाबचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
हरप्रीतने मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका पोलीस कर्मचाऱ्याची कार पळवली होती. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्या. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच आरोपी मुबरका चौकात कार सोडून एक स्कूटी घेऊन पसार झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशिष दुबे यांनी त्याचा पाठलाग केला. हरप्रीतने त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. हल्ल्यातून दुबे थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या मानेवर तसेच बोटांवर किरकोळ इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.