२३ जानेवारीला राज्यपाल भवनांवर शेतकरी धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:07 AM2021-01-03T07:07:39+5:302021-01-03T07:07:55+5:30
Farmer Protest: योगेंद्र यादव यांचे आवाहन, शेतकरी कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने राजपथवर यावे!
- विकास झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहन ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. २३ जानेवारीला प्रत्येक राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानावर स्थानिक शेतकऱ्यांनी धडक देण्याचेही आवाहन केले.
या आंदोलनाला शनिवारी ३८ दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे परत घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, यासाठी शेतकरी अडून आहेत. सरकार या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकार-शेतकऱ्यांमधील बैठका निष्फळ ठरत आहेत. थंडीने गारठलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी २६ जानेवारी रोजी राजपथवर ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्याची आत्महत्या
n गाझीपूर सीमेवर आंदोलन करीत असलेल्या ७५ वर्षीय कश्मीर सिंह यांनी उडाणपुलाखालील शौचालयात गळफास लावाला. ते उत्तर प्रदेशातील बिलासपूर येथून आले होते.
n कश्मीर सिंह यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सरकार म्हणणे ऐकत नाही, म्हणून मी कठोर निर्णय घेतला आहे. माझा अंत्यसंस्कार दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरच करण्यात यावा.
आज मुंबईत बैठक
n सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक झाली असून, हे आंदोलन प्रत्येक राज्यात पोहोचविण्याचा व आंदोलनाबाबत भ्रम निर्माण केला जातोय, तो पत्रकारांपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
n त्यानुसार, काही नेते विविध राज्यांकडे रवाना झाले आहे. रविवारी मुंबईत बैठक होत आहे. शनिवारी पाऊस आल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या तंबूत पाणी शिरले.