फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून अखेर सुटका; पीएसए कारवाई मागे घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:27 AM2020-03-14T01:27:54+5:302020-03-14T01:28:31+5:30
फारुक अब्दुल्ला यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवलेले आहे असा दावा एमडीएमकेचे नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता
श्रीनगर : गेल्या सात महिन्यांपासून नजरकैदेत असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची शुक्रवारी अखेर सुटका करण्यात आली. त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) केलेली कारवाई मागे घेण्यात आली आहे. माझ्याप्रमाणेच काश्मीरमधील इतर नेत्यांचीही लवकरच मुक्तता होईल, अशी आशा फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्या दिवसापासून फारुक अब्दुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर पीएसएच्या अन्वये १५ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या कारवाईला १५ डिसेंबर रोजी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही कारवाई मागे घेण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे गृह सचिव शालिन काब्रा यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानंतर फारुक अब्दुल्लांची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली. या आठवड्याच्या प्रारंभी डोळ््याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
फारुक अब्दुल्ला यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवलेले आहे असा दावा एमडीएमकेचे नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता. तिची सुनावणी होण्याआधीच अब्दुल्ला यांच्यावर पीएसएच्या अन्वये कारवाई करण्यात आली
होती. फारुक अब्दुल्ला यांची सुटका करण्याच्या निर्णयाचे नॅशनल कॉन्फरन्सने स्वागत केले आहे. ओमर अब्दुल्ला यांच्यासह काश्मीरमधील अन्य नेत्यांचीही मुक्तता करण्यात यावी अशी मागणी त्या पक्षाने शुक्रवारी केली आहे.
भविष्यात योग्य निर्णय घेणार
नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर फारुक अब्दुल्ला म्हणाले की, माझी मुक्तता होण्यासाठी ज्या खासदारांनी संसदेत लढा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. काश्मीरमधील अटकेत असलेल्या सर्व नेत्यांची मुक्तता झाल्यानंतर भविष्यात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.