Farooq Abdullah: "काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला"- फारूक अब्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 02:34 PM2022-05-16T14:34:08+5:302022-05-16T14:34:29+5:30
Farooq Abdullah on The Kashmir Files: "मुसलमान हिंदूला मारुन त्याच्या रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्याच बायकोला खायला सांगतो. आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?''
श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध 'द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. ''काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर सरकारने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालावी,'' असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
मीडियाशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ''सध्या देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संताप पसरतो आहे. मी सरकारला विचारले की, काश्मीर फाइल्स चित्रपट खरा आहे का? मुसलमान आधी हिंदूला मारेल, मग त्याचे रक्त तांदळात टाकून त्याच्याच बायकोला खायला सांगेल. हे होऊ शकतं का? आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?'
पाहा फारुख अब्दुल्ला काय म्हणाले:-
#WATCH We met LG Manoj Sinha to raise the issue of the law & order situation in J&K. During the meeting, I told him that the film 'The Kashmir Files' has given birth to hate in the country. Such things (films) should be banned: Dr Farooq Abdullah, National Conference pic.twitter.com/Z1BkoNijRO
— ANI (@ANI) May 16, 2022
लष्कर-ए-इस्लामने धमकी दिली
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली होती. "तुमचा बचाव दुप्पट-तिप्पट करा. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर टार्गेट किलिंगसाठी तयार व्हावे," असे म्हटले होते.
निशाण्यावर काश्मिरी पंडित
पुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली आहे. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात. हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून हे पोस्टर लिहिले आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून काश्मिरी पंडितांच्या परतीचे दावे केले जात आहेत, मात्र गेल्या तीन वर्षात पूर्वीपासून राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनाही राहू दिले जात नाही आहे.