'...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 02:33 PM2023-12-26T14:33:36+5:302023-12-26T14:36:42+5:30
Jammu & Kashmir: 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही, हा आधीपेक्षा जास्त वाढलाय.'
Farooq Abdullah on Terrorism ( Marathi News ): जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) दहशतवाद आणि लष्कराच्या कारवाईबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मंगळवारी(दि.26) मोठे वक्तव्य केले. संवादातूनच समस्या सोडवता येऊ शकते, अन्यथा आपली गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी स्थिती होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
#WATCH | National Conference MP Farooq Abdullah says, "Atal Bihari Vajpayee had said that we can change our friends but not our neighbours. If we remain friendly with our neighbours, both will progress. PM Modi also said that war is not an option now and the matters should be… pic.twitter.com/EcPx9B70jJ
— ANI (@ANI) December 26, 2023
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद संपलेला नाही. हा आधीपेक्षा जास्त वाढलाय. आज द्वेष इतका वाढलाय की, आपण एकमेकांचे शत्रू आहोत, असे मुस्लिम आणि हिंदूंना वाटते. नवाझ शरीफ (Nawaz Sharif) पाकिस्तानात पंतप्रधान बनणार आहेत. जर ते चर्चेला तयार असतील, तर आपण का करू नये? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
शेजाऱ्यांशी मैत्रीत दोघांची प्रगती
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या विधानाचा संदर्भ देत फारुख अब्दुल्ला म्हणाले, मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत. जर आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंधात राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. पण, जर आपण त्यांच्याशी शत्रुत्व राखले, तर आपण लवकर प्रगती करू शकणार नाही. आजच्या युगात युद्ध हा पर्याय नाही, असे खुद्द मोदीजींनी (Narendra Modi) म्हटले आहे. चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असंही अब्दुल्ला म्हणाले.
21 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला
दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर हल्ला केला होता. लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले, तर 3 जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर देत काही दहशतवाद्यांना ठार केले. महिनाभरात या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.