“...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 08:42 AM2024-01-19T08:42:01+5:302024-01-19T08:42:05+5:30

INDIA Alliance: इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला, तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

farooq abdullah reaction on seat sharing in india alliance for lok sabha election 2024 | “...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

“...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली असली तरी निवडणुका होईपर्यंत ती टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी आता कमी कालावधी आहे. जागावाटप लवकर झाले नाही तर इंडिया आघाडीसाठी तो धोका ठरू शकेल. जागावाटपाची प्रक्रिया किंवा निर्णय त्वरीत आणि योग्य वेळेत केले पाहिजे. इंडिया आघाडीत समावेश असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, तर काही पक्ष वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी तो सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. अद्यापही वेळ गेलेली नाही, असे सूतोवाच फारूक अब्दुल्ला यांनी केले.

जागावाटपावरून मतभेद कायम, अजूनही एकमत नाही

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाचे घोडे अडले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. जागावाटपाबाबत काँग्रेसने एक समिती स्थापन केली असून, त्यात मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांना विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाची रूपरेषा ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राज्यात जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील सीपीआय आणि सीपीआयएमलाही काही जागा सोडाव्या लागणार आहे. पण, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
 

Web Title: farooq abdullah reaction on seat sharing in india alliance for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.