“पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 09:08 AM2021-10-27T09:08:03+5:302021-10-27T09:10:10+5:30

विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

farooq abdullah says not in support of pakistan victory was celebrated to tease bjp | “पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

“पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

Next
ठळक मुद्देविजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला स्पष्ट संदेश दिलायजम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेलआताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे

श्रीनगर: जागतिक टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील काही भागात मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता त्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी उडी घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला म्हणाले की, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला विजय हा पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी नाही, तर भाजपला चिडवण्यासाठी होता. तसेच तो एक प्रकारे भाजपला इशाराही होता, असे सूचक विधान त्यांनी केले. 

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. त्याचाच हा परिणाम आहे. आताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, त्यानंतर याचे काय परिणाम होतील, हे सांगू शकत नाही, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पुँछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे

या विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेल. केंद्रीय गृहमंत्री दावा करतात की, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एकही गोळी चाललेली नाही. घराबाहेर सैन्य उभे केल्यावर हे कसे शक्य होते, असा प्रश्न ते विचारू इच्छितात, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दोन देशांमध्ये भारतातील हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ

भारत हा पाकिस्तानशी युद्ध झाल्यास त्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. बजेटमधील मोठा हिस्सा देत आहे. मात्र, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांचे सँडविच होत आहे. या दोन देशांतील संघर्षामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होत आहे, असा दावा अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केली होती. 
 

Web Title: farooq abdullah says not in support of pakistan victory was celebrated to tease bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.