"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:41 PM2024-05-07T16:41:20+5:302024-05-07T16:43:14+5:30
Lok Sabha Election 2024 : हिंदू आणि मुस्लिम कोणत्याही प्रकारे वेगळे आहेत का? असा सवाल करत या द्वेषाला वाव देण्यास राजकारणी जबाबदार आहेत, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी बडगाममध्ये भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, फारूख अब्दुल्ला यांनी हिंदू-मुस्लीमबाबत भाष्य केले. हिंदू-मुस्लीम हा सर्व द्वेष भारताला बळकट करेल का? हिंदू आणि मुस्लिम कोणत्याही प्रकारे वेगळे आहेत का? असा सवाल करत या द्वेषाला वाव देण्यास राजकारणी जबाबदार आहेत, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा आम्ही महात्मा गांधीजींचा भारत स्वीकारला होता. मोदींचा भारत नाही. गांधीजींचा भारत परत आणायचा आहे. जिथे आम्हाला सन्मानाने चालता येईल. शांतपणे बोलता येईल. एकत्र राहता येईल. एकमेकांना मदत करता येईल. तसेच, दुसरी व्यक्ती कोणत्या धर्माची किंवा समाजाची आहे, हे आपण पाहत नाही, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
#WATCH | Budgam, J&K: JKNC Chief Farooq Abdullah says, "... Will all this hatred strengthen India? Are Hindu and Muslim different in any way?... We are responsible for this hatred. Politicians are responsible for giving rise to this hatred... We had acceded to Gandhi's India and… pic.twitter.com/vVVacZikxb
— ANI (@ANI) May 7, 2024
दरम्यान, यापूर्वी फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, जोपर्यंत दहशतवादाचा प्रश्न आहे, त्याला कलम 370 जबाबदार आहे, असा भाजपा सरकारचा दावा होता. परंतु 5 ऑगस्ट 2019 रोजी ते रद्द केल्यानंतरही दहशतवाद अजूनही कायम आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शीतयुद्ध याला कारणीभूत आहे, जोपर्यंत दोन्ही देश संवादाची प्रक्रिया सुरू करून या समस्येवर तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत हे थांबणार नाही, असे मला वाटते, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते.
सहा जागा जिंकणार - फारुख अब्दुल्ला
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीच्या चांगल्या कामगिरीबाबत फारुख अब्दुल्ला यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकसभेच्या सर्व सहा जागा जिंकणार असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, जर इंडिया आघाडी जिंकली तर आम्ही आमच्या शेजारी देशाशी संवाद प्रक्रिया सुरू करू. भारताचे संविधान वाचवण्याचाही प्रयत्न करू. अनेक गोष्टी बदलतील, असा दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला. तसेच, आपला निवडणूक आयोग पुन्हा एकदा स्वतंत्र होईल. आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र असेल. ते भाजपाच्या इच्छेनुसार काम करणार नाहीत, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.