श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी
By Admin | Published: April 15, 2017 03:55 PM2017-04-15T15:55:06+5:302017-04-15T16:04:45+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. अब्दुल्ला यांनी पीडीपीचे नाझीर अहमद खान यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीत मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला तसेच मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. फक्त सात टक्के मतदानाची नोंद झाली.
गुरुवारी 38 मतदान केंद्रांवर पुन्हा फेरमतदान झाले. त्यावेळी फक्त दोन टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी मतदानाची नोंद झाली. एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. पण फारुख अब्दुल्ला आणि पीडीपी उमेदवार नाझीर अहमद खान यांच्यात थेट लढत होती. 2014 लोकसभा निवडणुकीत फारुख अब्दुल्ला पीडीपीच्या तारीक हमीद कारा यांच्याकडून पराभूत झाले होते.
कारा यांनी पीडीपी सदस्यत्यावाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. काश्मीरच्या इतिहासातील ही सर्वात वाईट निवडणूक आहे. मी जिंकलो असलो तरी, हिंसाचारामध्ये अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे या विजयाचा मला आनंद झालेला नाही असे अब्दुल्ला यांनी सांगितले. रविवारी काश्मीरमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता.