श्रीनगर पोटनिवडणुकीत फारूख अब्दुल्ला विजयी
By admin | Published: April 16, 2017 12:19 AM2017-04-16T00:19:16+5:302017-04-16T00:19:16+5:30
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शनिवारी १०,७०० मतांनी जिंकली.
श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शनिवारी १०,७०० मतांनी जिंकली. त्यांनी सत्ताधारी पीपल्स डेमोकॅ्रटिक पक्षाचे नजीर खान यांचा पराभव केला. अब्दुल्ला यांनी ४८,५५४ तर खान यांना ३७,७७९ मते मिळाली.
येथे नऊ एप्रिल रोजी हे मतदान झाले. त्यात मोठा हिंसाचार होऊन त्यात ८ जण ठार तर कित्येक जखमी झाले होते. या मतदार संघात फक्त ७.१३ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने हिंसाचारग्रस्त ३८ मतदान केंद्रांवर १३ एप्रिलला फेरमतदान घेतले. अब्दुल्ला यांचा हा लोकसभेवरील तिसरा विजय असून सत्ताधारी पीडीपीला धक्का मानला जातो. गेल्या वर्षी हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुऱ्हान वनी याच्या हत्येनंतर जो हिंसाचार उसळला त्यात लोकांवर जे अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ पीडीपीचे लोकसभा सदस्य तारीक हमीद कारा यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. (वृत्तसंस्था)
२० जण जखमी
पुलवामा गावात निदर्शक आणि सुरक्षा दले यांच्यात शनिवारी झालेल्या चकमकींत किमान २० जण जखमी झाले. डिग्री कॉलेजजवळ युवकांच्या गटाने दुपारी घोषणा देत सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी लाठीमार करून त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला.
सिक्किममध्ये एसडीएफ विजयी
गंगटोक : अप्पर बुर्टुक विधानसभा मतदारसंघात सिक्कीम डेमोकॅ्रटिक फ्रंटचा उमेदवार विजयी झाला. त्याने भाजपच उमेदवाराचा ८ हजार ३२ मतांनी पराभव केला. भाजपला ३७४ तर काँग्रेसला ९८ मते मिळाली. चार अपक्ष मतदारांना मिळून ४00 मते मिळाली