फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 07:09 AM2019-08-01T07:09:18+5:302019-08-01T07:09:23+5:30

क्रिकेट असोसिएशनमधील गैरव्यवहार

Farooq Abdullah's inquiry from 'ED' | फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

Next

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. ईडीच्या चंदिगढ कार्यालयामध्ये फारुक अब्दुल्ला हजर झाले. मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये ही चौकशी सुरू असून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून २००२ ते २०११ या कालावधीत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला मिळालेल्या निधीपैकी ४३ कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून फारुक अब्दुल्ला व अन्य तीन जणांविरुद्ध सीबीआयने गेल्या वर्षी जुलै महिन्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. इतर तिघांमध्ये जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन सरचिटणीस मोहम्मद सलीम खान, खजिनदार एहसान अहमद मिर्झा, जम्मू-काश्मीर बँकेचे अधिकारी बशीर अहमद मिसगर यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास २०१५ साली राज्य पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. असा कोणताही गैरप्रकार झाल्याचा फारुक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी याआधी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

चौकशी व राजकारणाचा संबंध नाही
मोदी सरकारच्या काळात सीबीआय, ईडी यांचा विरोधकांना धमकाविण्यासाठी वापर होत असल्याचे आरोप झाले आहेत. या सुरात फारुक अब्दुल्ला यांनीही सूर मिसळला होता. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या गेल्या काही वर्षांतील आर्थिक व्यवहाराची तपास यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून त्याचा आणि त्या राज्यातील राजकारणाचा काहीही संबंध नाही असे मोदी सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे.

Web Title: Farooq Abdullah's inquiry from 'ED'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.