जिवंत असताना भेटले नाहीत, मृत्यूनंतर संपत्तीसाठी अंगठ्याचा ठसा घ्यायला आले नातेवाईक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:40 IST2025-04-03T18:39:51+5:302025-04-03T18:40:59+5:30
एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हे महिलेच्या पुतण्यांना कळताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात पोहोचून संपत्तीसाठी महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

फोटो - मेटा एआय
उत्तर प्रदेशच्या फरुखाबाद जिल्ह्यातील फतेहगड भागात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हे महिलेच्या पुतण्यांना कळताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात पोहोचून संपत्तीसाठी महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ते संशयास्पद वाटलं आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून पुतण्यांनी हा प्रयत्न सोडून दिला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी नेण्यासाठी घाई केली.
मुन्नी देवी असं ६० वर्षीय महिलेचं नाव आहे, त्यांच्या पतीचं आधीच निधन झालं होतं. तसेच त्यांना मूलबाळ नव्हतं. पतीच्या निधनानंतर शेजारी राहणाऱ्या राकेश पाल याने मुन्नी देवी यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. मुन्नी देवीही त्याला आपल्या मुलासारखं मानत असे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांची संपत्ती राकेशच्या नावावर केली. मृत्युपत्रात तसं नमूद केलं होतं.
गेल्या महिन्यात मुन्नी देवी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुन्नी देवीच्या मृत्यूची बातमी मिळताच, तिचे पुतणे प्रेमपाल सिंह आणि धर्मवीर सिंह रुग्णालयात पोहोचले आणि त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न करू लागले. वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.
जेव्हा पुतण्यांनी मृतदेह त्यांच्यासोबत घरी नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा राकेश पाल यांनी त्याला विरोध केला. जेव्हा मुन्नी देवी आजारी होत्या तेव्हा कोणीही त्यांची काळजी घेण्यासाठी आलं नव्हतं. जिवंतपणी कोणीही त्यांना भेटायला आलं नाही. परंतु आता संपत्ती दिसल्यावर नातेवाईक आल्याचं राकेश यांनी म्हटलं आहे. राकेश आणि पुतणे या दोघांमध्ये याच्यावरून वाद सुरू झाला. परंतु अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह पुतण्यांच्या ताब्यात देण्यात आला.