MBA पास तरुणाला नोकरी नाही; वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचं पोट भरण्यासाठी चालवतो हातगाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:40 PM2022-05-24T17:40:29+5:302022-05-24T17:46:20+5:30
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी एमबीए पास असलेला तरुण हातगाडी चालवत आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी एमबीए पास असलेला तरुण हातगाडी चालवत आहे. त्याचे वडीलही हातगाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तरुणाच्या बहिणींनी हॉकीमध्ये अनेक मेडल जिंकली आहेत. पटियाला येथे झालेल्या ऑल इंडिया सीनियर हॉकी टूर्नामेंटमध्ये त्याच्या बहिणींनी आपले कर्तृत्व दाखवले. अशा परिस्थितीत एमबीए उत्तीर्ण झालेल्या या तरुणाने सरकारकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
लव कांत कठेरिया असं या तरुणाचं नाव आहे. त्याने 2019 मध्ये एमबीए पूर्ण केल्याचं सांगितलं. "मलाही अभ्यासादरम्यान शिष्यवृत्ती मिळाली. एमबीए पूर्ण केल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. य़ाच दरम्यान, नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही. पप्पाही हातगाडी चालवायचे, त्यातून कुटुंबाचा खर्च चालायचा. तेच काम आता मी जबाबदारी म्हणून करतो" असं तरुणाने म्हटलं आहे.
हातगाडी चालवून महिन्याभरात जवळपास पाच ते सहा हजार रुपये कमावत असल्याचं तरुणाने म्हटलं आहे. लव कांत कठेरिया याने दिलेल्या माहितीनुसार, "खर्च खूप आहेत. कधी सिलिंडर, कधी वीज बिल, कधी दूध… घराचा सर्व खर्च… इतक्या पैशात भागत नाही. यासोबतच भाऊ-बहिणीचे शिक्षण, आईचे औषध याकडेही पाहावे लागते. घरात तीन बहिणी, एक भाऊ आणि आई आहे. एक बहीण NIS करत आहे."
"एक बहीण एथलीट आहे, ती विभागीय स्तरावर खेळली आहे. तिने 2017 मध्ये इटावा आणि 2018 मध्ये हरदोई येथे रौप्य पदके जिंकली होती. अशा परिस्थितीत तरुणाला योगी सरकारकडून मदतीची आशा आहे. सरकारने मला नोकरी दिली नाही तरी माझ्या बहिणींना नोकरी द्या. माझ्या वडिलांवर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आल्या आहेत. 6 हजारात घर चालवणे कठीण होत आहे" असंही तरुणाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.