23 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा खात्मा, 11 तासांनंतर थरारनाट्य संपले, पोलिसांना 10 लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:00 AM2020-01-31T05:00:44+5:302020-01-31T06:55:12+5:30
मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून आरोपी त्यांना ओलीस ठेवले होते.
उत्तर प्रदेश : फर्रुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये 23 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी खात्मा केला आला असून मुलांची सुखरूप सुटका केली आहे. या वृत्ताला उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) यांनी दुजोरा दिला आहे. तर, दुसरीकडे, गावातील लोकांनी मारहाण केल्यामुळे आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपीच्या तावडीतून 23 मुलांची सुखरूप सुटका करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली आहे. तसेच, आयजी रेंज कानपूर आणि डीएम व एसपी यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वी केले. खात्मा करण्यात आलेल्या आरोपीवर 2001 मध्ये गावातील एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. या हत्येच्या प्रकरणात सध्या त्याची जमीनावर सुटका झाली होती, असे ओ. पी. सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, मुलीच्या वाढदिवसानिमित्त आसपासच्या लहान मुलांना बोलावून आरोपीने त्यांना ओलीस ठेवले होते. सुभाष बाथम असे या आरोपीचे नाव आहे. मोहम्मदाबादमधील करसिया गावामध्ये आरोपी सुभाष बाथम याचे घर आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचे तिला कळाले. तिने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर दरवाज्याच्या मागून बॉम्बफेक करुन गोळीबारही केला. यामध्ये एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. तसेच, त्याने बॉम्बफेक केल्याने एक भिंत कोसळली. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला होता. मात्र, सायंकाळपर्यंत पोलिसांना मुलांची सुटका करण्यात अपयश आले. यानंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली होती. तसेच, राज्य सरकारकडून एनएसजी कमांडोची मागणी करण्यात आली. मात्र, 11 तासानंतर आरोपी सुभाषचा खात्मा करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आणि मुलांची सुटका करण्यात आली.