ओसामा बिन लादेन माझा गुरू, अधिकाऱ्यानं कार्यालयात फोटो लावला; प्रशासन हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:02 PM2022-06-01T13:02:29+5:302022-06-01T13:04:17+5:30
फर्रुखाबादच्या नवाबगंज परिसरात असणाऱ्या वीज नियामक कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
फर्रुखाबाद - क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन ज्यानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करत अमेरिकेला हादरवलं. ही दुर्देवी घटना आजही लोकांच्या मनात कायम आहे. आता ओसामा बिन लादेन या जगात नाही मात्र उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जगातील अत्यंत क्रूर समजल्या जाणाऱ्या ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला गुरू मानून एका अधिकाऱ्याने चक्क त्याच्या कार्यालयात लादेनचा फोटो लावल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे.
फर्रुखाबादच्या नवाबगंज परिसरात असणाऱ्या वीज नियामक कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याठिकाणी ओसामा बिन लादेनचा फोटो भिंतीवर लावल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. इतकेच नाही तर ओसामा बिन लादेनच्या फोटोखाली त्याला जगातील सर्वश्रेष्ठ अभियंता म्हणून उल्लेख केला आहे. त्याखालोखाल एसडीओ रविंद्र प्रकाश गौतम यांचं नाव लिहिण्यात आले आहे.
या व्हायरल फोटोनंतर वरिष्ठ अधिकारीही खडबडून जागे झाले आहेत. अधीक्षक अभियंता एसके श्रीवास्तव म्हणाले की, या घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमण्यात आली आहे. कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल. फर्रुखाबादच्या नवाबगंज येथील वीज नियामकाच्या कार्यालयात प्रतिक्षालयाच्या भितींवर ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्याचं व्हायरल झाले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली.
इतकेच नाही तर या प्रकरणी अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांना काही माध्यम प्रतिनिधींनी फोन केला असता त्यांनी सांगितले की, दहशतवादी ओसामा बिन लादेन माझा गुरू आहे. हा फोटो जर कुणी हटवला तर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी तो लावला जाईल. कार्यालयात हा फोटो माझ्याकडून लावण्यात आला होता असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. मात्र या घटनेची माहिती व्हायरल झाल्यानंतर आता सगळीकडे या प्रकाराची भलतीच चर्चा सुरू झाली आहे.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याला २१ वर्षे पूर्ण
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन जुळ्या इमारतींवर ११ सप्टेंबर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींमध्ये विमाने आदळवण्यात आली होती. यामध्ये २९८३ लोक मारले गेले होते. या हल्ल्यामध्ये अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात होता. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून अल कायदाचे कंबरडे मोडले होते. ओसामा पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये पाकिस्तानी छावणीजवळ राहत होता. अमेरिकेने एका मोहिमेत २०११ मध्ये त्याला ठार केले होते.