अरे देवा! लग्नात गरमागरम चपाती न मिळाल्याने तुफान राडा; फेकल्या खुर्च्या, झाली हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:30 IST2024-02-12T17:11:01+5:302024-02-12T17:30:34+5:30
लग्नात आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चपाती न मिळाल्याने गोंधळ उडाला. पाहुण्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या.

फोटो - zeenews
लग्नामध्ये अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. यूपीच्या फर्रुखाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चपाती न मिळाल्याने गोंधळ उडाला. पाहुण्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. एवढंच नाही तर त्याने आचाऱ्यालाही रिव्हॉल्व्हर दाखवलं. फर्रुखाबादच्या शमसाबाद पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. सुभाष यांची मुलगी सुधा हिचं लग्न होतं. कासगंज येथून वरात आली होती.
लग्नाची वरात उशीरा आली. नवरदेव शिवमच्या मित्रांनी वेटरकडे गरम चपाती मागतली. तेव्हा वेटरने गरम चपाती मिळणार नाही असं सांगितलं. यानंतर आलेल्या पाहुण्यांनी जेवण करणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यास सांगितलं. त्याला थेट रिव्हॉल्व्हर दाखवत धमकावलं. यावरून पुढे वाद सुरू झालं. वादाचं रुपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
पोलिसांनी लग्नासाठी आलेले अनेक पाहुणे आणि कुटुंबीयांना पकडून पोलीस ठाण्यात नेलं. ज्यांच्यासोबत वाद झाला ते लोक दारूच्या नशेत होते, असा आरोप केला आहे. गरम चपाती न मिळाल्याने नवरदेवाने लग्नाची वरात परत फिरवली. याआधी दोघांचा साखरपुडा झालेला आहे.
लग्नाची वरात आधीच खूप उशिरा पोहोचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर काही पाहुणे दारूच्या नशेत बराच वेळ नाचत राहिले. त्यामुळे जेवायला खूप उशीर झाला. यानंतर ते पाहुणे जेवायला बसले तेव्हा गरम चपाती न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. तसेच हाणामारी देखील केली. यानंतर लग्न झालंच नाही.