हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:24 PM2023-10-23T15:24:53+5:302023-10-23T15:25:16+5:30
सरकारने देशभरात 10,000 km लांब डिजिटल हायवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेने होणार आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल क्रांती घडली आहे. आता यात आणखी वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) देशात 10,000 किमी लांबीचा डिजिटलमहामार्ग तयार करणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि हैदराबाद-बंगळुरू कॉरिडॉरची डिजिटल महामार्गाची निर्मिती सुरू करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
NHI ने 2025 पर्यंत देशभरातील 10,000 किमी रस्त्यांवर ऑप्टिक फायबर केबल टाकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तुमच्या मनात प्रश्न येत असेल की डिजिटल हायवे म्हणजे काय? याचा कोणाला फायदा कसा होईल? डिजिटल महामार्ग किंवा रस्ते, हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. याद्वारे रस्त्यांचे नेटवर्क तर सुधारेल, शिवाय दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट सुविधा पुरवल्या जातील. या योजनेत त्या महामार्गांचा विकासही होईल.
डिजिटल महामार्ग कसा बांधणार?
डिजिटल हायवे बांधण्याचे काम ऑप्टिकल फायबर केबल्स (OFC) द्वारे केले जाईल. निवडक द्रुतगती मार्ग आणि महामार्गांवर या तारा टाकल्या जातील. यामुळे आसपासच्या भागातही इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढेल. ऑप्टिकल फायबरमध्ये काचेच्या आणि प्लास्टिकच्या लहान तारा असलेल्या नळ्या असतात. याद्वारे, सामान्य तारांपेक्षा अधिक वेगाने माहिती पाठविली जाऊ शकते. हे नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे बांधले जाईल. ही कंपनी NHAI चे पूर्ण मालकीचे युनिट आहे.
डिजिटल महामार्ग कुठे बांधणार?
पथदर्शी प्रकल्प म्हणून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील 1367 किलोमीटर आणि हैदराबाद-बंगळुरू कॉरिडॉरवरील 512 किलोमीटरची निवड करण्यात आली आहे. यामुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यात मदत होईल. NHAI ची योजना संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जुळते. यामध्ये 2030 पर्यंत सर्वांना सुरक्षित, परवडणारी, सुलभ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.