कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 10:57 PM2021-06-26T22:57:53+5:302021-06-26T23:05:39+5:30
Covid 19 Vaccine : २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण सुरू झालं आहे. पंतप्रधानांनी घेतला कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात सुरु असलेल्या कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेतला. "कोरोना महासाथीविरोधात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा वेग यापुढेही कायम ठेवण्यात यावा. लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एनजीओंचीदेखील मदत घेतली पाहिजे," असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. देशातील १२८ जिल्ह्यांमधील ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आलं. दरम्यान, यावेळी कोविन प्लॅटफॉर्मबाबत (CoWIN platform) जगभरात रुची वाढत असल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. कोरोना लसीकरणाच्या वेगाबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. तसंच याची व्याप्ती वाढवण्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचाही सल्ला दिला.
'अधिकाऱ्यांनी देशातील लसीकरणाबाबत व्यापक प्रेझेंटेशन पंतप्रधानांसमोर सादर केलं. यामध्ये त्यांना निरनिराळ्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची माहीती देण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन व्हर्कर्स ( Healthcare workers, Frontline Workers) आणि सामान्य जनतेच्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढील काही महिन्यांत लसींचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्याबाबतही माहिती दिली,' असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
PM Modi reviews progress of COVID-19 vaccination, expresses satisfaction over rising speed of doses
— ANI Digital (@ani_digital) June 26, 2021
Read @ANI Story | https://t.co/gog2sbP2Rgpic.twitter.com/pIUnOJHPRn
आपण राज्य सरकारांच्या संपर्कात असून निराळे प्रकार लागू करून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याबाबत प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी यासाठी एनजीओंची मदत घेण्याचाही सल्ला दिला. याशिवाय राज्यांच्या संपर्कात राहून चाचण्यांचं प्रमाण कमी होऊ नये याचीही काळजी घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.