प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:22 AM2020-12-25T05:22:49+5:302020-12-25T06:59:10+5:30
Fasttag : फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते.
नवी दिल्ली : येथील टाेलनाक्यांवर हाेणारी गर्दी कमी करणे तसेच टाेल संकलनाचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ असणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी हाेणार असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, १ जानेवारी २०२१ पासून सर्व वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनचालकांना राेख रक्कम देऊन टाेलनाक्यांवर थांबण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळेसाेबत इंधनाचीही बचत हाेणार आहे. जुन्या वाहनांनाही फास्टटॅग लावणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे फास्टटॅग?
फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते. टाेलनाक्यावरून जाताना त्या खात्यातून आपाेआप टाेलचे पैसे वळते हाेतात. त्यामुळे जास्त वेळ थांबण्याची गरज राहत नाही.