गुवाहाटीमध्ये एसयुव्ही-पिकअपमध्ये भीषण अपघात; इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:02 AM2023-05-29T10:02:15+5:302023-05-29T10:02:40+5:30
गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे.
आसामच्या गुवाहाटीमध्ये भीषण अपघात झाला आहे. जलुकबाड़ी भागात मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप आणि कारमध्ये झालेल्या टक्करीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी झाले आहेत.
गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. एका फ्लायओव्हरवर हा अपघात झाला आहे. आसाम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी एसयुव्ही कारमधून जात होते. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या पिकअपला जाऊन धडकली. यानंतर कार पुन्हा डिव्हायडरवर जाऊन आदळली.
जलुकबारी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात गुवाहाटी येथील अरिंदम भवाळ आणि निओर डेका, शिवसागर येथील कौशिक मोहन, नागाव येथील उपांगशु सरमाह, माजुली येथील राज किरण भुईया, दिब्रुगढ येथील इमोन बरुआ आणि मंगलदोई येथील कौशिक बरुआ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Assam | At least seven dead and several others injured in a road accident that took place in the Jalukbari area of Guwahati on Sunday late night. pic.twitter.com/5gELk04tCR
— ANI (@ANI) May 29, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी स्कॉर्पिओ कारमध्ये दहा जण प्रवास करत होते. दहापैकी सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर अवस्थेत तातडीने गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे.