सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:27 AM2024-10-19T11:27:14+5:302024-10-19T11:28:37+5:30
Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एका बसला भीषण अपघात झाला आहे. येथे ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून उलटून शारदा नदीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एका बसला भीषण अपघात झाला आहे. येथे ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून उलटून शारदा नदीत कोसळली. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामधील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सायकलस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हा अपघात सिद्धार्थनगर येथीलल बढनी ब्लॉकजवळील मोहनकोला गावात झाला आहे. देवीपाटन मंदिरातून माघारी येत असताना चरगवां पूलाजवळ ही बस उलटली. या अपघातात ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर ३ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बलरामपूर येथून येत असलेली ही बस एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चरगवां येथील नाल्यामध्ये कोसळली. अपघातग्रस्त बसमधून एकूण ५३ प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी बलरामपूर येथील देवी पाटण मंदिरामध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथून परत असताना हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली. जखमींना उपचारांसाठी बढनी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तर इतरांना सीएससी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली असून, त्यामध्ये मंगनीराम या सायकलस्वाराचाही समावेश आहे. याशिवाय अजय शर्मा आणि गामा यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.