अयोध्येच्या राम मंदिराला जमीन देण्याविरोधात थेट इराकहून फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:41 PM2018-08-27T20:41:29+5:302018-08-27T20:43:30+5:30
शिया समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह अल सिस्तानी यांनी हा फतव्याचा ई-मेल केला आहे.
कानपूर : अयोध्येतील राम मंदिराला वक्फ बोर्डाची जागा देण्यासाठी बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, याला थेट इराकमधून फतव्याद्वारे विरोध करण्यात आला आहे. शिया समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह अल सिस्तानी यांनी हा फतव्याचा ई-मेल केला आहे.
सिस्तानी यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे की, वक्फ बोर्डाची कोणतीही जागा मंदिर किंवा दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थळांसाठी देता येऊ शकत नाही. उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या मजहर अब्बास नक्वी यांनी याबाबत सिस्तानी यांच्याकडे या बाबतची विचारणा केली होती. यास सिस्तानी यांनी उत्तर पाठविले आहे. तसेच वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी न्यायालयातील याचिका मागे घ्यावी आणि बोर्डाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नक्वी यांनी केली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वसीम रिजवी यांनी राम मंदिराचा वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अयोध्येतील वक्फ बोर्डाची जमीन मंदिरासाठी दिली जावी, या आशयाची याचिका दाखल केली होती. या बदल्यात लखनऊमध्ये 'मस्जिद-ए-अमन' म्हणजेच शांततेचे प्रतिक असलेली मशीद बनविण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाला मार्च-2016 मध्ये वक्फ बोर्डाने धुडकावून लावले होते.