फेरगुणांकनानंतर जुळ्या बहिणीवर मात करून 'ती' आली राज्यात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:49 AM2022-10-23T06:49:30+5:302022-10-23T06:49:50+5:30
फतेहपूर येथील या बहिणींची नावे दिव्या आणि दिव्यांशी गुप्ता अशी आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेशच्या १२ वी विज्ञान परीक्षेत दोन जुळ्या बहिणींपैकी एक पहिली आली होती. मात्र, दुसरी खूपच खाली फेकली गेली होती. कमी गुण मिळालेल्या बहिणीने पेपर फेरगुणांकनासाठी टाकले. त्यातून तिचे गुण इतके वाढले की, ती स्वत:च राज्यात पहिली ठरली!
फतेहपूर येथील या बहिणींची नावे दिव्या आणि दिव्यांशी गुप्ता अशी आहेत. दोघींच्या जन्मात फक्त १७ मिनिटांचे अंतर आहे. दिव्यांशीला राज्यात प्रथम घोषित करण्यात आले होते. पेपर फेरगुणांकनानंतर त्यांच्या १२ वी परीक्षेतील गुणांत फक्त २ गुणांची तफावत आहे.
आधी ४३३ गुण
१२ वीचा निकाल जाहीर झाला तेव्हा दिव्याला ४३३ (५०० पैकी) गुण पडले होते. तिची सरासरी ८६.६ टक्के होती. तिची जुळी बहीण दिव्यांशी हिला ४७७ गुण (५०० पैकी) पडले होते.
असे वाढले गुण
दिव्याने हिंदी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र अशा ३ पेपरच्या फेरगुणांकनासाठी अपील केले. त्यात तिचे हिंदीचे ३८ गुण वाढले. तिचे भौतिकशास्त्राचेही ८ गुण वाढले. त्यामुळे तिचे एकूण गुण ४७९ (५०० पैकी) झाले.
आधी माझी बहीण स्वत:च्या यशाबद्दल आनंदी होती. आता ती आम्हा दोघींसाठी आनंदी आहे.’
- दिव्या गुप्ता