अपघातग्रस्त वडिलांना सायकलवर बसवून केला १२०० किमीचा प्रवास; पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे धाडस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:44 PM2020-05-23T23:44:32+5:302020-05-23T23:44:52+5:30
हरियाणातून बिहारपर्यंत मारली मजल, सायकलिंग फेडरेशनने घेतली दखल
पाटणा : लॉकडाऊनमुळे रेल्वे तसेच सार्वजनिक , खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पंधरा वर्षांची एक मुलगी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर मागे बसवून हरियाणातील सिकंदरपूरहून १२०० किमीचा व सलग आठ दिवसांचा प्रवास करत बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घेऊन आली. तिच्या अनोख्या धाडसाची कहाणी उजेडात येताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका हिनेही समाजमाध्यमांवर तिचे कौतुक केले आहे.
मूळ बिहारची रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव ज्योतीकुमारी पासवान असे आहे. वडिलांसाठी तिने दाखविलेल्या धाडसाबद्दल सर्वजण प्रभावित झालेच पण सायकल चालविण्याच्या तिच्या कौशल्यालाही अनेकांनी दाद दिली. ज्योतीकुमारी पासवानला सायकलिंगचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास स्पर्धांमध्ये ती उत्तम खेळाडू म्हणूनही नाव कमावेल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यानुसार सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकारसिंग यांनी तिला भेटण्यास बोलावले. तिने १२०० किमीचा प्रवास सायकल चालवत कसा केला, याचा तपशील जाणून घेतला. ज्योतीला सायकलिंगचे उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ओंकारसिंग यांनी
दिले आहे.
आपल्या वडिलांना ज्योती ज्या सायकलवर घेऊन आली ती गुलाबी रंगाची सेकंड हँड सायकल तिने दोन हजार रुपयांना विकत घेतली होती. तिला उत्तम सायकलपटू होण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्योतीचे वडील मोहन हे ई-रिक्षाचे चालक असून एका अपघातामध्ये त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नाही, त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मोहन यांचा रोजगार बुडाला.
दोन वेळच्या जेवणाला मोदात होण्याची वेळ आल्याने हरियाणातून बिहारमधील आपल्या जन्मगावी जाण्याचा त्यांनी विचार केला. पण सर्व वाहतूक स्थगित करण्यात आल्यामुळे ते व ज्योती हरियाणातील सिकंदरपूरमध्येच अडकून पडले. तिथून बिहारला मूळ गावी जाण्यासाठी मग ज्योतीनेच शक्कल लढविली. तिने आपल्या वडिलांना सायकलवर मागे बसवून पँडल मारत १२०० किमीचा प्रवास आठ दिवसांत हिकमतीने पार पाडला.
सर्व कुटुंब पुन्हा एकत्र झाले
मोहन यांची पत्नी बिहारमधील गावामध्ये अंगणवाडी सेविकेचे काम करते. त्यांची मोठी मुलगी व जावई हे फेब्रुवारीमध्येच गावी परतले आहेत. या प्रवासात ज्योती व तिचे वडील मोहन हे काही तास पालवाल, आग्रा, मथुरा येथे थांबले होते. थोडीशी विश्रांती घेऊन मग ते पुढच्या प्रवासाला निघत. ते दोघेही गावाला परतल्याने आता सारे कुटुंबीय पुन्हा एकत्र नांदत आहेत.