'बाप'माणूस... दंगलखोरांनी मुलाला ठार मारल्यानंतरही 'तो' शांततेचं आवाहन करत राहिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 04:12 PM2018-03-31T16:12:39+5:302018-03-31T16:12:39+5:30
धर्माच्या नावावर पेटलेल्या या आगीतही सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण बघायला मिळालं आहे.
आसनसोल : पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये रामनवमीच्या दिवसापासून पेटलेल्या धार्मिक दंगली अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. राज्यातील काही शहरं गेल्या चार दिवसांपासून आगीने होरपळताहेत. आसनसोल आणि रानीगंजमध्ये दंगलीत आत्तापर्यंत चार लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण धर्माच्या नावावर पेटलेल्या या आगीतही सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण बघायला मिळालं आहे.
आसनसोलमधील धार्मिक दंगलीत एका मशिदीतील इमामाच्या 16 वर्षांच्या मुलाची हत्त्या करण्यात आली. इतक्या तरुण मुलाला गमावल्यानंतरही इमाम इसदादुल रशीदी यांनी शहर जळण्यापासून वाचवलं. गुरुवारी शांतता ठेवण्याचं आवाहन करताना म्हणाले की, सूड घेण्याची भाषा कराल तर मस्जिद आणि शहर सोडून जाणार.
आसनसोलच्या एका मशिदीत जवळपास तीस वर्षांपासून मौलाना इमदादुल रशीदी इमाम म्हणून काम पाहत आहेत. रामनवमी दरम्यान भडकलेल्या धार्मिक दंगलीत त्यांचा 16 वर्षांचा मुलगा सिबतुल्ला रशीदी याची हत्त्या करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच आसनसोलच्या मशिदीसमोर हजोरोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. जमा झालेल्या संतप्त लोकांना इमाम रशीदी यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सूड घेण्याचा विचार कराल तर मी मस्जिद आणि शहर सोडून जाणार. आणखी कुणाचाही मुलगा दगावला जावू नये असे मला वाटते.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मृत सिबतुल्ला रशीदी याने याचवर्षी दहावीची परीक्षा दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलखोरांनी त्याला पळवले होते. बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याला गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
सिबतुल्लाचे वडील इमाम इमदादुल रशीदी म्हणाले की, तो बाहेर गेला तेव्हा दंगल सुरु होती. काही लोकांनी त्याला धरुन नेले. माझ्या मोठ्या मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. तर पोलिसांनी त्याला बाहेर वाट पाहण्यास सांगितले. नंतर अशी माहिती देण्यात आली की, पोलिसांना मृतदेह मिळाला आहे. या मृतदेहाची ओळख दुस-या दिवशी सकाळी पटवण्यात आली.