मुलाला दंश करणा-या सापावर पित्याने जाहीर केलं 5000 रुपयांचं बक्षिस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 02:04 PM2017-08-09T14:04:58+5:302017-08-09T14:05:47+5:30
सापामुळे त्रस्त झालेल्या 45 वर्षीय शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी घराबाहेर दोन सुरक्षारक्षकही उभे केले आहेत.
शहाजहानपूर, दि. 9 - शहाजहानपूरमध्ये एका शेतक-याने सापावर बक्षिस जाहीर केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. बक्षिसही काही साधंसुधं नसून तब्बल पाच हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. या सापाचा शोध घेणे हेच या शेतक-याचे मुख्य लक्ष्य आहे. सापाने गेल्या दोन वर्षात चार वेळा आपल्या मुलाला दंश केला असल्याचा दावा या शेतक-याने केला असून, जो कोणी सापाला पकडून आणेल त्याला पाच हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल असं जाहीर करण्यात आलं आहे.
सापामुळे त्रस्त झालेल्या 45 वर्षीय शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी घराबाहेर दोन सुरक्षारक्षकही उभे केले आहेत. मुलाची सुरक्षा करणे ही एकमेवर जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. फक्त सुरेंद्र कुमारच नाही तर गावातील लोकांचंही म्हणणं आहे की, साप सूड घेण्याच्या उद्देशाने फक्त सुरेंद्र कुमार यांच्या मुलाला वारंवार दंश करत आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, '21 वर्षीय बृजभान याने प्रथेचं पालन करण्याच्या नावाखाली ऑक्टोबर 2015 मध्ये एका सापाला मारलं होतं. यानंतर बरोबर एका वर्षानंतर 2016 मध्ये बृजभानला सापाने दंश केला होता. ज्या सापाची हत्या केली, त्याचा तो साथीदार होता असा बृजभानचा दावा आहे. आपल्याला मे, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही सापाने दंश केला होता असा दावा बृजभानने केला आहे'.
सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, 'साथीदाराची हत्या केल्याने साप वारंवार माझ्या मुलाला दंश करत आहे. त्याने गेल्या दोन वर्षात चार वेळा दंश केला असून आता आम्ही कोणताही धोका पत्करु शकत नाही'. अंधश्रद्धेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे.