अब्जाधीश पित्याचा मुलगा शिकतोय दुकानदारी
By Admin | Published: July 23, 2016 05:38 AM2016-07-23T05:38:16+5:302016-07-23T05:38:16+5:30
सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे.
कोची : ते गुजरातमधील सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असूनही त्यांनी आपल्या तरुण मुलाला सामान्य काम करण्यासाठी केरळात पाठविले आहे. यामागचा उद्देश एवढाच आहे की, मुलाला दुकानदारी समजावी. गरीब लोक नोकरी आणि पैशांसाठी कसा संघर्ष करतात ते त्याला समजावे हाच यामागचा हेतू असल्याचे सावजी ढोलकिया सांगतात.
हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट या कंपनीची व्याप्ती ७१ देशांत आहे. सावजी यांचा मुलगा द्रव्या (२१) याने अमेरिकेतून एमबीए केले आहे. २१ जून रोजी द्रव्या हा केरळला रवाना झाला. त्याला खर्चासाठी वडिलांनी सात हजार रुपये दिले आणि अगदी गरज भासल्यासच ते पैसे खर्च करायचे सांगितले. याबाबत बोलताना सुरतमधील सावजी ढोलकिया म्हणाले की, माझ्या मुलाला मी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पैसे मिळविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, एका ठिकाणी आठवड्यापेक्षा अधिक काळ काम करायचे नाही. आपल्या वडिलांची ओळख कुठे सांगायची नाही. मोबाईलचा वापर करायचा नाही. अनुभवाशिवाय कुठल्याही विद्यापीठात हे शिकायला मिळणार नाही. द्रव्याला नोकरीचे आलेले अनुभव त्याने सांगितले. या ठिकाणी त्याला कोणी ओळखत नव्हते. भाषेची अडचण होती. तब्बल ६० ठिकाणी त्याला रिजेक्ट करण्यात आले. नोकरी नाकारणे काय असते? आणि नोकरीची किंमत काय आहे? हे आपल्याला या काळात समजल्याचे त्याने सांगितले. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना अशा अनुभवांची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)
>खाचखळगे अन् ठेचा...
दोन दिवसांपूर्वीच घरी परतलेला द्रव्या आपल्या अनुभवाबाबत सांगतो की, आपण कॉल सेंटर, शूज शॉप आणि मॅकडोनाल्डच्या शॉपमध्येही काम केले. महिनाभरात चार हजारांची कमाई केली.
येथे ४० रुपयांना मिळणाऱ्या जेवणास मी संघर्ष केला. तर लॉजवर राहण्यासाठी मला प्रति दिवस २५० रुपये लागत होते. एकूणच काय तर पैशांबाबत कधी फारसा विचार न करणारा द्रव्यासारखा तरूण या ठेचा खाउन खूप काही
शिकला आहे.