भाऊ अन् वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन परीक्षा दिली, दहावीत मिळवले 92 टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:40 AM2019-05-09T11:40:33+5:302019-05-09T11:41:57+5:30
कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळूनही परीक्षेत घवघवीत यश
गाझियाबाद: दहावीच्या परीक्षेआधी वडील आणि भाऊ गमावणाऱ्या टिया सिंहनं 92.4 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं. दहावीचा पहिला पेपर देण्याआधी टियाच्या वडिलांचा आणि भावाचा अपघाती मृत्यू झाला. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना टियानं परीक्षा दिली आणि आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
6 मार्चला टियाचा भाऊ आणि वडील दुचाकीवरुन जेवण आणायला गेले होते. त्यांचा अपघात झाला. यात टियाचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी टियाचा दहावीचा पहिला पेपर होता. मात्र अपघातामुळे टिया आणि कुटुंबाची संपूर्ण रात्र रुग्णालय, शवागार आणि घर अशा धावपळीत गेली. सकाळी दु:ख बाजूला सारुन टिया परीक्षा देण्यासाठी गेली. सोमवारी परीक्षेचा निकाल आला. टियाला 92.4 टक्के गुण मिळाले. टियानं इंग्रजीत 99, समाजशास्त्रात 95, हिंदीत 90 आणि गणित आणि विज्ञानात प्रत्येकी 89 गुणांची कमाई केली.
'घरात दु:खाचं वातावरण होतं. संपूर्ण रात्र ती रडत होती. तिला जराही झोप लागली नाही. प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या भावाला, वडिलांना भेटण्यासाठी ती रात्री रुग्णालयात गेली होती. तिनं मलाही वेळोवेळी आधार दिला आणि सकाळी परीक्षेला गेली,' अशा शब्दांत टियाची आई रिना सागर यांनी घडलेला प्रसंग सांगितला. 'पहिला पेपर देऊन ती परतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गर्वितची (टिनाचा भाऊ) आणि वडिलांची प्राणज्योत मालवली होती. परीक्षा देऊन आलेली टिना वडील आणि भावाच्या अंत्यविधीला उपस्थित होती. आदल्या रात्री वडिलांनी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. तोच सल्ला लक्षात ठेवून तिनं सर्व पेपर दिले,' असं रिना म्हणाल्या. खडतर परिस्थिती मुलीनं मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.