हृदयद्रावक! बापाला शवविच्छेदनासाठी बाईकवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:42 AM2021-05-27T09:42:47+5:302021-05-27T09:48:59+5:30
जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; बराच वेळ थांबूनही वाहनं मिळालं नाही
सीतापूर: प्रशासनाचा कारभार किती बेजबाबदार असू शकतो, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आली आहे. आपला मुलगा गमावलेल्या एका वडिलांवर त्याच मुलाचा मृतदेह दुचाकीवरून शवविच्छेदनासाठी नेण्याची वेळ आली. सीतापूरच्या जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला. मदतीसाठी लाचार झालेल्या वडिलांनी मृतदेह नेण्यासाठी गयावया केली. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना मुलाचा मृतदेह दुचारीवरून न्यावा लागला.
मुंबईहून परतलेल्या युवकानं लावला गळफास; खोलीच्या भिंतीवर लिहिलं होतं आत्महत्येचं ‘कारण’ अन्...
तालगावच्या देवरियात राहणाऱ्या छविनग यांचा मुलगा अंकुरचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. एका अपघातात जखमी झाल्यानंतर अंकुरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अंकुरच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर बुधवारी जिल्हा रुग्णालयात पंचनामा झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी सुरू केली. मृतदेह पाठवण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितलं.
वाहनासाठी अंकुरच्या कुटुंबियांनी आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णालयातील व्यवस्थेशी संपर्क साधला. छविनग यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाशी संपर्क साधला. त्यानं १० मिनिटांत येतो असं सांगितलं. मात्र एक तास उलटूनही तो न आल्यानं छविनग आणि त्यांचे कुटुंबीय चालकाकडे गेले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. वेळ निघून जात होती. दीड तास उलटूनही वाहनाची व्यवस्था न झाल्यानं छविनग यांनी अंकुरचा मृतदेह घेऊन दुचाकीवरून शवविच्छेदनगृह गाठलं.