बापरे ! ४ कोटी रुपयांना विकले गेले गाडीचे टायर्स..
By admin | Published: June 16, 2016 12:55 PM2016-06-16T12:55:37+5:302016-06-16T13:24:29+5:30
हौसेला मोल नसतं असं म्हणतात, हीच उक्ती दुबईत खरी ठरली असून तेथे गाडीच्या टायर्सचा सेट तब्बल ४ कोटी रुपयांना विकला गेला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. १५ - २४ कॅरेट सोनं आणि हि-यांनी मढवलेले चार टायर्स दुबईतील एका कंपनीने बनवले असून ते तब्बल ४ कोटी रुपयांना (२२ लाख दिराम) विकले गेले आहेत. आत्तापर्यंत एखाद्या गाडीच्या टायर्सना मिळालेली ही सर्वात मोठी किंमत असून दुबईतील 'झेड' या कंपनीने बनवलेल्या या टायर्सच्या सेटची ' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंद करण्यात आली आहे.
मात्र तब्बल ४ कोटी रुपये किमतीचे हे टायर्स विकत घेणा-याला आता या 'सोनेजडित' टायर्सच्या सुरक्षेसाठीच पहारेकरी तैनात करावे लागतील असे दिसते. कारण चोरांच्या हातात हे घबाड पडल्यास उनकी तो लाईफ बन जायेगी..! त्यामुळेच या टायर्सच्या मालकांला सुरक्षेसोबतच टायर्सचा इन्श्युरन्स (विमा) काढणेही भाग असून एवढ्या किमती टायर्सचा इन्श्युरन्स काढण्यास कोणती कंपनी तयार होईल? हाही एक मोठाच प्रश्न आहे..
दुबईतील 'झेड' कंपनीने प्रथमच असे ४ टायर्स बनवले असूने सोने-हिरेजडित टायर्सचा एकमेव सेट आहे. जगातील एक्स्क्लुझिव्ह ज्वेलर्सपैकी एक असलेल्या इटलीतील आर्टिसन ज्वेलर्सने या टायर्सवरील सजावट केली असून ही टायर्स दुबईत डिझाईन करण्यात आली आहेत. तर अबू धाबीतील राष्ट्राध्यक्षांचे नवे निवासस्थान (महाल) बनवणा-या कारागीरानेच या टायर्वरील सोन्याची सजावट केल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान या टायर्सच्या विक्रीतून मिळालेले ४ कोटी रुपये 'झेनिसेस फाऊंडेशन'ला दान करण्यात येणार आहेत.
'आम्ही नेहमीच कौशल्य व निष्ठेला महत्व दिले असून त्यामुळे आमची 'झेड' कंपनीला पसंती मिळत आहे. रमझानचा पवित्र महिना सुरू असून तेच लक्षात ठेऊन आम्ही या टायर्सच्या विक्रीतून मिळालेला पैसा जगभरातील शिक्षण व्यवस्थेत सुधार व्हावा यासाठी काम करणा-या 'झेनिसेस' फाऊंडेशनला देण्याचा निर्णय घेतला' असे झेड टायर्सचे प्रमुख परजीव कंधारी यांनी सांगितले.