‘स्वच्छ भारत’चे जनक लोहियाच
By admin | Published: October 13, 2016 05:00 AM2016-10-13T05:00:34+5:302016-10-13T05:00:34+5:30
आज ‘स्वच्छ भारत अभियान’ ची बरीच चर्चा असली तरी प्रत्यक्षात ५० च्या दशकात प्रसिद्ध समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनीच
पाटणा : आज ‘स्वच्छ भारत अभियान’ ची बरीच चर्चा असली तरी प्रत्यक्षात ५० च्या दशकात प्रसिद्ध समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनीच त्याची सुरुवात केली, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येथे केले. ते बुधवारी येथे डॉ. लोहियांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
नितीश कुमार म्हणाले, ‘आज स्वच्छतेबद्दल खूप बोलले जात असले तरी अगदी सुरुवातीला त्याची कल्पना लोहियांनी मांडली. स्वच्छतेवर भर देणारे ते पहिले नेते होते.’ एकदा लोहिया यांनी पंडित नेहरू यांना सांगितले होते की तुम्ही प्रत्येक खेडे आणि गावात शौचालय बांधले तर मी तुम्हाला विरोध करायचे थांबवेन, अशी आठवण नितीश कुमार यांनी सांगितली.
नितीश कुमार हे लोहियांच्या विचारांचे आहेत. महिलांना शौचास उघड्यावर जावे लागते हा प्रत्येकाला शाप आहे, असे लोहिया नेहमी म्हणत. बिहारमध्ये ‘स्वच्छता अभियान’ लोहियांच्या नावाने राबविले जात असून त्याचे नाव ‘लोहिया स्वच्छ बिहार’ असे असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)