अपघातात माहेरची २४ माणसं दगावली; तरीही डोळ्यातील अश्रू लपवत बापानं लावलं मुलीचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:24 PM2020-02-27T12:24:45+5:302020-02-27T12:30:07+5:30
राजस्थानमध्ये एका वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला होता.
माधोपूर - बुधवारी सकाळी माधोपूर कोटा हायवेवर मेज नदीत बस कोसळल्याने २४ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील प्रवासी माधोपूर येथील रहिवाशी रमेश चंद्र यांच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते. ही घटना समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण नवरी आणि तिची आई लग्नाच्या समारंभात पूर्णपणे गुंग होते. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करताना दिसले. कारण आपल्या कुटुंबातील वऱ्हाडी मंडळीचा अपघात झाल्याची भनकही त्यांना लागली नव्हती.
जन्म आणि मृत्यू कधीही थांबत नाही असं म्हटलं जातं. बुधवारी सकाळी नीमचौकी येथील रहिवाशी रमेश आणि त्यांचे कुटुंब मुलीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. संध्याकाळी मॅरिज गार्डन येथे मुलीच लग्न लागणार होतं. रमेश यांची पत्नी दुपारपासून लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीची वाट पाहत होती. नवरीचे मामा-मामी, आजोबा त्याचसोबत कोटाहून येणारे नातेवाईक या सर्वांची वाट पाहिली जात होती. तेव्हा रमेशला फोन आला, मेज नदीमध्ये हायवेवरुन येणारी बस पाण्यात पडली आहे. त्यात प्रवास करणाऱ्या २७ जणांपैकी २४ जणांचा मृत्यू झाला त्यावेळी रमेशला धक्का बसला.
ज्यावेळी रमेशला ही माहिती समजली तेव्हा तो गार्डनच्या एका बाजूला होता तर कुटुंब हॉलमध्ये लग्नाची तयारी करत होतं. काहीजण नाचत होते तर नवरा-नवरीचे लग्नापूर्वीचे विधी सुरु होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमासाठी रमेशची मुलगी सीमा आणि रमेशची पत्नी बादाम सज्ज झाल्या होत्या. अपघाताच्या बातमी ऐकून रमेश सुन्न अवस्थेत होता. त्याचवेळी आई-मुलगी आणि बाकीचे कुटुंब लग्नाच्या धावपळीत होते.
या अपघाताची माहिती मिळताच तेथे उभे असलेले उर्वरित नातेवाईक काही वेळातच रमेशकडे आले. दुसरीकडे जयपूरहून वरात निघाली होती. रमेशच्या नातेवाईकांनी त्यावेळी रमेशला धीर देत मुलीचा विवाह संपन्न करण्याचा सल्ला दिला. मात्र ही गोष्ट नवरी आणि तिच्या आईला समजून न देणं आव्हानात्मक होतं. प्रत्येकाने ठरवले की काहीही झाले तरी आई व मुलीला या अपघाताची बातमी मिळणार नाही. चार सुज्ञ आणि जबाबदार लोकांनी या घटनेची माहिती नवरी आणि तिच्या आईपासून लपवण्यासाठी प्रयत्न केले अनेकांना त्यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखले.
रमेशने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी व मुलगी दुपारी 3 वाजेपर्यंत वारंवार विचारत होते, सकाळी अकरा वाजता येणारं वऱ्हाड अद्याप का आलं नाही? यावर पत्नी बादाम यांची आईची तब्येत वाटेत येताना बिघडली त्यामुळे त्यांना उशीर झाला आहे. वयोवृद्ध आईची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथेच अडकले आहे असं रमेशने सांगितले. दरम्यान, मुलगी व पत्नीचे मोबाइलही त्याच्याकडून घेण्यात आले. यामुळे, ते कोणाशीही थेट संवाद साधू शकले नाहीत.
सकाळी दहा वाजेपासून रमेश आपल्या मुलीच्या पाठवणीपर्यंत दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाले. जेव्हा ते मुलगी आणि बायकोकडे गेले तेव्हा त्यांचा चेहरा पूर्णपणे आरामदायक आणि आनंदी दिसत होता, परंतु एका कोपऱ्यात आल्यानंतर कोणच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडताना दिसत होते. ज्यावेळी अपघाताची माहिती पत्रकारांना मिळाली त्यानंतर मीडियाचे लोक विवाहस्थळी पोहचले, तेव्हा रमेश यांनी हात जोडून सगळ्यांना इथं कोणाला काही माहित नाही अशी विनंती केली. त्यामुळे कोणीही शूट केलं नाही. संपूर्ण लग्न पार पडल्यानंतर रमेशचा बांध फुटला.