...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं; लेकाच्या वाढदिवसाचा केक कापतानाच वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:15 PM2023-09-07T12:15:01+5:302023-09-07T12:20:20+5:30
एका कॉलनीत मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक कापत असताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका कॉलनीत मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक कापत असताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. त्यामुळेच कुटुंबप्रमुखाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
लखनौच्या चिन्हाट पोलीस ठाण्यातील मुलायम नगरमधील हे प्रकरण आहे. येथे सुनील शर्मा (45) पत्नी किरण आणि 3 मुलं साक्षी, सार्थक आणि मन्नतसोबत राहत होते. बुधवारी रात्री सुनील आपला मुलगा सार्थकच्या वाढदिवसाचा केक कापत होते. याच दरम्यान सुनील अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पत्नी किरणच्या म्हणण्यानुसार, घरावर 22 लाखांचे कर्ज होते, ज्याचा हप्ता दरमहा 70 हजार रुपये होता. या महिन्यात हप्ता कमी झाल्यावर सावकाराने खूप अपमान केला होता. त्यामुळे सुनील खूप काळजीत होता.
एडीसीपी ईस्ट झोन अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तक्रार आल्यास आरोपींवर कारवाई केली जाईल. व्याजावर पैसे घेण्याचे कुटुंबीयांनी सांगितलं आहे. सुनील त्याच कारणाने काळजीत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.