वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:47 AM2022-05-31T10:47:40+5:302022-05-31T12:32:21+5:30
आश्रमातील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले.
वडील आयपीएस. आईही यूपीएससी पास. त्यामुळे लहानपणापासूनच मीही आयपीएस होण्याचे ठरवले होते. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर, एक वर्ष मुंबईत काम केले. वर्षाला १८ लाखांचे पॅकेज होते. मात्र, डोळ्यासमोर आयपीएस होण्याचे स्वप्न असल्यामुळे नोकरी सोडून जालना येथील दत्त आश्रम गाठले, असं यूपीएससी परीक्षेत १८१व्या क्रमांकाने पास झालेल्या रामेंद्र प्रसाद यांनी सांगितलं.
आश्रमातील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. ज्या गोष्टीपासून आकर्षित होतो. अशा सोशल मीडिया, मित्रमंडळी तसेच कुटुंबापासून स्वतःला दूर ठेवून, आश्रमातच राहण्याचा विचार केला, असं रामेंद्र प्रसाद म्हणाले.
तीन वर्ष दिवसरात्र एक करत अभ्यास पूर्ण केला आणि यूपीएससी परीक्षेत १८१व्या क्रमांकाने पास झालो. त्यामुळे मीदेखील वडिलांप्रमाणे आयपीएस होणार असल्याचा मला गर्व असल्याचे आयपीएस अधिकारी चिरंजीव प्रसाद यांचा मुलगा रामेंद्र प्रसाद याने सांगितले. आश्रमातील अन्नदान, सेवाभावाप्रमाणे भविष्यात काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक, नंतर औरंगाबादचे पोलीस आयुक्त व सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक असलेले चिरंजीव प्रसाद यांचा मुलगा रामेंद्र प्रसाद याने यूपीएससी परीक्षेत देशात १८१ वी रँक मिळवली.
आयआयटी, खरगपूर येथून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या रामेंद्रने ‘हाऊसिंग डॉट कॉम’मध्ये दीड वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्याने ‘संस्कृत’ हा ऐच्छिक विषय घेऊन यूपीएससीची तयारी सुरू केली व घवघवीत यश मिळवले. गिटार वादनाचीही त्याला आवड आहे. रामेंद्र याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.