गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 01:26 PM2023-02-28T13:26:04+5:302023-02-28T13:27:27+5:30
Indian Army: गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हुतात्मा जवानाच्या वडिलांनी घरासमोरील सरकारी जमिनीवर जवानाचं स्मारक बनवलं होतं. त्या स्मारकाविरोधात काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करताना या हुतात्मा जवानाच्या वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांना अटक केली.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील पोलिसांवर हा मारहाणीचा आरोप झाला आहे. त्यानंतर ग्रामस्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात संतप्त आहेत. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील कजरी बुजुर्ग गावात ही मारहाणीची घटना घडली आहे. येथील रहिवासी असलेल्या राज कपूर सिंह यांचा मुलगा जयकिशोर याला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीमध्ये वीरमरण आलं होतं.
जयकिशोर हा हुतात्मा झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी सरकारी जमिनीवर घरासमोर त्याचं स्मारक बनवलं. जयकिशोरचा भाऊ नंदकिशोर याने याबाबत माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी आम्हाला १५ दिवसांच्या आत स्मारक हटवण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस घरी आले. त्यानंतर त्यांनी वडिलांना अटक केली. तसेच मारहाण करत त्यांना सोबत घेऊन गेले.
याबाबत एसडीपीओ पूनम केशरी यांनी सांगितले की, राजकुमार सिंह यांच्याविरोधात हुतात्मा जवानाची प्रतिमा लावण्यासाठी जमिनीवर अवैधरीत्या कब्जा करणे, अनुसूचित जातीच्या व्यक्तींना मानसिक त्रास देणे याबाबत ग्रामस्थांनी तक्रार दिली होती. त्याची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र अटक करताना त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करण्यात आले नाही.