दत्तक गेलेल्या अनाथ मुलीने अखेर शोधला पिता!

By admin | Published: October 31, 2016 06:06 AM2016-10-31T06:06:08+5:302016-10-31T06:06:08+5:30

स्वीडनमधील एका दाम्पत्यास दत्तक दिल्या गेलेल्या मुलीने अखेर २२ वर्षांनी आपल्या जन्मदात्या पित्याचा शोध घेण्यात यश मिळविले आहे.

The father of the orphaned father finally discovered! | दत्तक गेलेल्या अनाथ मुलीने अखेर शोधला पिता!

दत्तक गेलेल्या अनाथ मुलीने अखेर शोधला पिता!

Next


बंगळुरु : येथील ‘आश्रय’ अनाथालयातून अनाथ म्हणून स्वीडनमधील एका दाम्पत्यास दत्तक दिल्या गेलेल्या मुलीने अखेर २२ वर्षांनी आपल्या जन्मदात्या पित्याचा शोध घेण्यात यश मिळविले आहे. आपल्या खऱ्या रक्ताच्या नात्याची कल्पनाही नसलेल्या या बाप-लेकीची गेल्या आठवड्यात बंगळुरात भेट झाली तेव्हा दोघांनाही भावनांचे फुटलेले बांध आवरणे कठीण झाले. या दोघांची भेट घडवून आणण्यात महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या पुणे येथील ‘सखी’ या स्वयंसेवी संस्थेची मोलाची मदत झाली.
ज्योती आणि गायत्री या दोन बहिणींना त्या अनुक्रमे ५ आणि ४ वर्षांच्या असताना ‘आश्रय’ अनाथालयातून १९९४ मध्ये दत्तक दिले गेले होते. आपल्याला अनाथालयात आणून सोडले गेले तेव्हा आपण ओक्साबोक्शी रडत होतो, हे ज्योतीला चांगले आठवत होते. स्वीडनला गेल्यावर त्या गावातील गौरवर्णी नसलेल्या त्याच फक्त दोघीजणी होत्या. त्यामुळे वेगळेपणाची त्यांना कायम जाणीव होत राहिली व त्यातूनच आपले मूळ शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला.
सन २०१३ मध्ये ज्योती आणि गायत्री आपल्या स्विडिश दत्तक पालकांसोबत प्रथम बंगळुरुला आल्या आणि जेथून त्यांना दत्तक घेतले त्या ‘आश्रय’ अनाथालयात गेल्या. बरीच गयावया केल्यावर अनाथालयाने त्यांच्या जन्मदात्या आईचे नाव कमलाबाई होते व तिने या दोघींना तेथे आणून सोडताना आपण एकटी राहणारी माता असल्याचे सांगितले होते. कमलाबाई सन १९९६ मध्ये या दोघींचे काय झाले याची चौकशी करण्यासाठी अनाथालयात येऊन गेली होती,असेही त्यांना सांगण्यात आले. पण याहून अधिक माहिती त्यांना मिळली नव्हती.
आता आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आपण नेमकी कोणाची मुलगी आहोत याचा शोध घेण्याचा पक्का निर्धार करून ज्योती पुन्हा भारतात आली. तिने पुण्याची ‘सखी’ ही संस्था आणि त्यांच्या संस्थापिका अंजली पवार यांच्याशी संपर्क साधला.
पवार यांना सोबत घेऊन यावेळी ज्योती पुन्हा ‘आश्रय’ अनाथालयात गेली तेव्हा त्यांनी तिच्या दत्तकविधानासंबंधीची सर्व फाईल तिला उपलब्ध करून दिली. त्यावरून असे दिसले की तिच्या जन्मदात्या आईचे नाव कमलाबाई व पित्याचे नाव दशरथ असे आहे. अनाथालयात दोन्ही मुलींना आणून सोडले तेव्हा कमलाबाई बंगळुरुच्या चामराजपेट भागात राहात असल्याची नोंद होती. तेथे जाऊनही काही शोध लागेना तेव्हा पवार यांनी बंगळुरु शेजारी असलेल्या मारुलुकट्टे गावात चौकशी करण्याची सूचना केली. कारण अनाथालयात कमलाबाईचा तेथील मूळ पत्ता लिहिलेला होता.
मारुलुमुट्टे गावात कमलाबाई शाळेत आपल्या वर्गात होती, असे सांगणारी एक बाई त्यांना भेटली. एकाकडून दुसऱ्याकडे चौकशी करीत ज्योती २३ आॅक्टोबर रोजी सुसिवेगुंटे गावात पोहोचली. तेथे तिला तिच्या वडिलांचा-दशरथ यांचा-मोठा भाऊ भेटला. कमलाबाई व दररथ यांना ज्योती आणि गायत्री नावाच्या दोन मुली होत्या असे या चुलत्याने स्वत:हून सांगितले आणि ओळख पक्की पटली.
या चुलत्याने बंगळुरु येथे दशरथला फोन केला व ज्योतीला तेथील पत्ता देऊन दुसऱ्या दिवशी तेथे जाण्यास सांगितले. २४ आॅक्टोबर रोजी बंगळुरु शहराच्या कुमारस्वामी लेआऊटमधील पहिल्या मजल्यावरील एका छोट्याशा घरात तिचा शोध संपला. तेथे तिला आपले वडील दशरथ भेटले. दोघांच्या चेहऱ्यातील साम्य, बोलण्याची तशीच ढब यावरून तेच आपले वडील आहेत, याबद्दल
ज्योतीची खात्री झाली. तरीही नक्की नाते सिद्ध करण्यासाठी ती ‘डीएनए’ चाचणी करून घेणार आहे. (वृत्तसंस्था)
>घोड्यावरील
स्वारीची आठवण
लहानपणी आपल्याला घोड्यावरून फिरायला नेले जात असे, असे
ज्योतीला आठवत होते. दशरथ बंगळुरु महापालिकेच्या आरोग्य विबागात नोकरी करतात. लहानपणी आपण दोन्ही मुलींना घोड्यावर बसवून फेरफटका मारण्यासाठी नेत असू, असे त्यांनी सांगितले आणि खात्री आणखी पक्की झाली.
>आईचाही घेत राहणार शोध
ज्योती व गायत्री या दोन्ही मुलींना घेऊन कमलाबाई घरातून निघून गेली ती पुन्हा आलीच नाही, असे दशरथ यांनी सांगितले. तेथे ज्योतीला मारुती भेटला.
मारुती हा या दोघींनंतर झालेला मुलगा. म्हणजे ज्योतीचा सख्खा भाऊ. मारुतीने सांगितले की, १० वर्षांपूर्वीपर्यंत कमलाबाईशी त्याचा संपर्क होता.
पण नंतर ती वारल्याचे लोकांनी सांगितले. पण ज्योती अशा सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. कमलाबाई भेटेपर्यंत किंवा तिचा मृत्यूदाखला मिळेपर्यंत ती शोध घेईल, असे पवार यांचे म्हणणे आहे.
>जन्मदात्या पित्याचा शोध लागल्याने आता मला मानसिक शांती मिळेल. दत्तक माता-पित्यांनी आम्हाला काही कमी पडू दिले असे नाही. पण आपण मुळात दुसऱ्या देशातील दुसऱ्या कोणाचे तरी मूल आहोत हे मनातून जात नाही. -ज्योती स्वाहन, स्वीडनमध्ये दत्तक गेलेली मुलगी

Web Title: The father of the orphaned father finally discovered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.